जामखेड न्यूज—–
व्यापाऱ्यांनी विकासकामांना विरोध करून शहराचे नुकसान करू नये – प्रा. शहाजी डोके
शहरातील रस्ते गेले कुठे?
सध्या जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. यासाठी नगरपरिषदेच्या वतीने कालपासून नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे या नोटिसीना विरोध करत शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने उपोषण, रास्तारोको व हायकोर्टात धाव घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. तेव्हा सामान्य नागरिकांच्या वतीने जिव्हाळा फाउंडेशनचे सदस्य प्रा. शहाजी डोके यांनी सांगितले की, शहराचे पुढील पन्नास वर्षाचे नियोजन गृहीत धरून रस्ता बनवला जात आहे. तो सुरळीत होऊ द्यावा. शासकीय नियमानुसार होत असलेल्या रस्त्याला कोणीही आडकाठी आणू नये. व्यापारी व जनतेची दिशाभूल करून कोर्टात जाण्याची भाषा करत कोणीही शहराचे नुकसान करू नये. अतिक्रमण करणारे गुन्हेगार आहेत त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे.
पुढे बोलताना प्रा. डोके म्हणाले की, काही वर्षापूर्वी शहरातील मेन रोड पेठेतून विठ्ठल मंदिरासमोरून एसटी बस जात होती. आता नीट रिक्षा जात नाही मग हा रस्ता कोठे गेला तसेच अनेक व्यापारी शासकीय जागेवर रस्त्यावर आपले दुकानातील सामान लावतात व काही दिवसात अतिक्रमण करतात त्यामुळे अतिक्रमण धारक व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत वापरलेल्या शासकीय जागेचे भाडे वसुल करावे.
शासकीय रस्ता शंभर फुट नोंद आहे. तर मग यासाठी कसलाही विरोध होता कामा नये. रस्ता रूंद झाल्यास शहराचे रूपच पालटते. रस्ता म्हणजे विकास काम आहे. राजेंद्र कोठारी यांनी व्यापारी वर्गाला व राजकारणी मंडळीनां चुकीचे मार्गदर्शन करून, सर्व शहराचे आणि तालुक्यातील जनतेचे कायमचे नुकसान करू नये. अशी विनंती प्रा. शहाजी डोके यांनी केली आहे.
काय म्हणाले होते राजेंद्र कोठारी
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या
– पक्क्या बांधकामधारकना, व्यापारी वर्गाला
नगरपरिषदेच्या वतीने कालपासून सरसकट नोटिसा दिल्या जात असून, पुढील चार दिवसांत आपापले बांधकाम काढून घेण्याचे त्वरीत आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग हवालदिल झाले असून, त्यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, जर डिव्हाडर, युटीलीटी एरिया कमी केला तर रस्ता नियोजनाप्रमाणेच होईल. शिवाय शहराचा कणा असलेली बाजारपेठही सुरक्षित राहिल. वास्तविक, नगरपरिषदेच्या वतीने नोटिसा देताना नॅशनल हायवेच्या सध्याच्या नॉर्मप्रमाणे १५ मी. वरील संबंधितांना नोटिसा देणे आवश्यक असतानाही, त्या रेषेवरीलही मालमत्ता धारक, सीटी सर्व्हेला असलेल्या नोंदी, जागा अशी कोणतीही खातरजमा न करता सरसकट नोटिसा दिल्या आहेत याविरोधात व्यापाऱ्यांच्या वतीने रास्तारोको, उपोषण व हायकोर्टात धाव घेण्याचा इशारा राजेंद्र कोठारी यांनी दिला होता.
याला उत्तर म्हणून प्रा. शहाजी डोके यांनी जामखेड न्यूजशी बोलताना सांगितले की, राजेंद्र कोठारी यांनी व्यापारी वर्गाला व राजकारणी मंडळीनां चुकीचे मार्गदर्शन करून, सर्व शहराचे आणि तालुक्यातील जनतेचे कायमचे नुकसान करू नये. अशी विनंती करण्यात आली आहे. रस्ते हे विकासाचे लक्षण आहे. याला कोणीही विरोध करू नये अशी सर्वसामान्य जनतेच्या वतीने विनंती डोके यांनी केली आहे. तसेच आतापर्यंत अतिक्रमण करून शासकीय जागा वापरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करावा असेही सांगितले आहे.