जामखेड न्युज——
ह.भ.प. कारभारी गर्जे सर यांचे निधन
ह.भ.प. कारभारी तबाजी गर्जे सर (वय ७१) यांचे सोमवारी सकाळी ८ वा. दीर्घ आजाराने निधन झाले आहे. दुपारी दोनच्या दरम्यान जामखेड येथील तपनेश्वर अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
कारभारी उर्फ ज्ञानदेव गर्जे सर हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी (वडगाव) येथील रहिवासी. रयत शिक्षण संस्थेच्या खंडेश्वरी टाकळी तालुका कर्जत या विद्यालयामध्ये त्यांची अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर विंचूर नाशिक, मढेवडगाव श्रीगोंदा, आळसुंदे कर्जत, जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात जवळपास 30 वर्ष त्यांनी अध्यापक म्हणून नोकरी केली. पंचक्रोशी विद्यालय नायगाव ता. जामखेड येथे मुख्याध्यापक पदावर काम करत असताना 2010 साली ते सेवानिवृत्त झाले.
त्यांचा सेवेतील विषय इंग्रजी होता. परंतु त्यांचे इंग्रजी बरोबरच संस्कृत व मराठी भाषेवर प्रभुत्व होते. ज्ञानेश्वरी श्रीमद्भगवद्गीता ही त्यांची मुखातगत होती. संत तुकाराम गाथा श्रीमद् भागवत यावर त्यांचा चांगला अभ्यास होता. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचे विशेष योगदान होते. जामखेड तालुक्यात त्यांचे अनेक ठिकाणी कीर्तने प्रवचने झाली. भजन कीर्तन प्रवचन हा त्यांचा आवडीचा विषय होता. अगदी आजारपणात देखील त्यांचे वाचन चालू होते. वारकरी संप्रदायातील सर्व ग्रंथ त्यांच्याकडे संग्रहित होते. वारकरी संप्रदाय बरोबरच त्यांचे स्वाध्याय परिवारात सुद्धा मोठे योगदान होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांना अर्धांग वायूचा त्रास असल्याने ते सहसा घरीच असायचे. गेल्या दोन महिन्यापासून त्यांचा आजार बळावला व सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला.
गर्जे सरांचे कागदोपत्री नाव कारभारी होते. परंतु स्वतः ते सतत ज्ञानदेव गर्जे असंच लिहायचे. त्यांना हे कारभारी हे नाव आवडत नसायचे ते नेहमी म्हणायचे मी कुठलाही कारभार करत नाही माऊलींचे नाव हेच मला आवडतं. त्यांची वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा होती.
गर्जे सर यांच्या मागे पत्नी लताबाई, विवेक गर्जे, विनय गर्जे ही दोन मुले. विना मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.