जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून तीन दिवसात सुटणार कुकडीचे उन्हाळी आवर्तन
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून ५ मार्चला सुटणार कुकडीचे उन्हाळी आवर्तन
आ. रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेल्या मागणीला यश; शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी मिळणार पाणी
काही महिन्यांपूर्वी पुण्यात पाणी नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या बैठकीत मतदारसंघातील कुकडी प्रकल्पाचे आवर्तन योग्य वेळेत आणि उच्च दाबाने सोडण्याबाबत तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या शेतीला नदीतून पाणी मिळण्याबाबत मंत्र्यांसोबत चर्चा केली होती. त्यानुसार आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून शेतकऱ्यांचा गरजेच्या वेळी कुकडीचे उन्हाळी आवर्तन येत्या ५ मार्चला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जत तालुक्यातून कुकडी डावा कालवा जातो. त्याचा तालुक्यातील एकूण 54 गावांना शेतीसाठी उपयोग होतो. पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास ते जळून शेतकऱ्यांची अतोनात नुकसान होऊ शकते. सध्या या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना या आवर्तनाचा गरजेच्या वेळी नक्कीच फायदा होणार आहे.
आमदार रोहित पवार यांनी कुकडी बांधकाम वितरण विभाग कोळवडी येथे शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या सोबत पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार तारखा निश्चित करून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी त्या तारखा मंत्री महोदयांकडे सादर केल्या होत्या. पाण्याचे योग्य नियोजन झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुरुवातीस गावांना शेतीसाठी पाणी मिळाले तर हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल. यादृष्टीने आमदार रोहित पवार यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी हिताचा निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी विनंती बैठकीत केली होती त्यानुसार सकारात्मक निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी कमी पाणी असतानासुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न केला होता. यंदा पाणीसाठा चांगला असल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने यंदाचे नियोजन होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनीही व्यक्त केला होता. आता शेतकऱ्यांना कुकडीचे आवर्तन वेळेत मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.