जामखेड न्युज——
ब्रह्मज्ञान समजण्यासाठी पूर्वी साधू, योगीजन तप तिर्थाटण करत हभप संजयजी महाराज देशमुख
वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह
ब्रह्मज्ञानासारखे ज्ञान येथे जर कोणाला सहज कळून आले असते किंवा कानावर पडताचक्षणी लगेचच उमगले असते तर त्यासाठी म्हणजेच ते समजण्यासाठी वेद आणि शास्त्रे एवढी कष्टी झालीच नसती. हे गूढ ब्रह्मज्ञान समजण्यासाठी येथे पूर्वी साधू, योगीजन तप तिर्थाटण करीत असे संजयजी महाराज देशमुख यांनी सांगितले.
साकत मधील वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहात संजयजी महाराज देशमुख यांची किर्तन सेवा झाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात ह. भ. प. संजयची महाराज देशमुख यांचे किर्तन झाले.
त्यांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला व त्याचे निरूपण केले.
ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी । तरी का हिंपुटी वेशास्त्रें ।।
शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटण । उवच भ्रमण याजसाठी ॥
याजसाठी जप याजसाठी तप । व्यासेही अमूप ग्रंथ केले ।।
याजसाठी संतपाय हे सेवावे । तरीच तरावे तुका म्हणे ।।
तुकाराम महाराज म्हणतात की ब्रह्मज्ञानासारखे ज्ञान येथे जर कोणाला सहज कळून आले असते किंवा कानावर पडताचक्षणी लगेचच उमगले असते तर त्यासाठी म्हणजेच ते समजण्यासाठी वेद आणि शास्त्रे एवढी कष्टी झालीच नसती. ते म्हणतात एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञान नेमके आहे तरी काय किंवा नेमके कोणाला समजले आहे किंवा कोणाला ते अधिक समजले ह्यात एकमत होण्यासाठीदेखील येथील सहा शास्त्रांमध्ये वारंवार भांडणे होतात, कोणा एकाचे मत दुसऱ्याशी जुळून येत नाही.
ते पुढे म्हणतात की असे हे गूढ ब्रह्मज्ञान समजण्यासाठी येथे पूर्वी साधू, योगीजन तप तिर्थाटण करीत किंबहुना याच्यासाठी ते पूर्ण पृथ्वीलाच प्रदक्षिणा घालीत, तिचे पायीच संपूर्ण भ्रमण करीत. हेच कळून येण्यासाठी कित्येकांनी
जप, तप केले, कित्येक अन्य साधनांची आटाआटी केली, व्यासांनी तर त्यावर अमूप ग्रंथदेखील लिहिले. तुकोबाराय शेवटी म्हणतात की परंतु कितीही केले तरी ब्रह्मज्ञान होण्यासाठी किंवा गूढ अशी ब्रह्मस्थिती आकळण्यासाठी येथे कोणतीच साधने कामाची नाहीत, वर सांगितलेले कोणतेच उपाय ते प्राप्त करून देऊन शकत नाही, ते
म्हणतात येथे एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे संतपाय उपासने, त्यांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करणे कारण त्यांनी जर आपल्यावर कृपा केली तरच ते साध्य करून घेता येते आणि तेव्हाच कोठे जाऊन ह्या भवसागरातून देखील तरता येते.
कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती कीर्तनासाठी हभप उत्तम महाराज वराट, हभप कैलास महाराज भोरे, बिभीषण महाराज कोकाटे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, हभप हरीभाऊ काळे, बाबा महाराज मुरूमकर, दिनकर मुरूमकर, मनोहर मुरूमकर, पुरूषोत्तम मोरे, दत्तू नाना वराट, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, आश्रम मुरूमकर, दिपक अडसूळ यांच्या सह पारगाव घुमरा, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, देवदैठण, साकत भजनी मंडळ तसेच नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था नगर येथील तीस चिमुकले वारकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.
सोमवार दि. १७ रोजी संजयजी महाराज देशमुख
मंगळवार दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे
तसेच मंगळावर १८ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन तसेच
बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.
तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.