चांगल्या मित्रांच्या संगतीने सकारात्मक बदल व मानसिक आधार मिळतो –  जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न         

0
208
जामखेड न्युज——
 चांगल्या सवयी असलेले मित्र आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवून मानसिक आधार देतात. वाईट सवयीच्या  मित्रांच्या संगतीमुळे आपली अधोगती होते. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी आज येथे केले. 
अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , प्रियदर्शनी पब्लिक स्कूल व महाविद्यालय, बार असोसिएशन व  सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमली पदार्थांचे सेवन, त्यातील पिडीतांचे अधिकार व उपायोजना, बालकांचे शोषण आणि रस्ता सुरक्षा नियम’ या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यावेळी ते  बोलत होते. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री का. पाटील, प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अंजली बोधक, अहमदनगर बार असोसिएशनचे सदस्य समीर पटेल, सेंट्रल बार असोसिएशनचे उपाध्यक्ष फारुख शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलाकर जाधव व सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ आदी उपस्थित होते. 
प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.यार्लगड्डा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अडचणीच्या वेळी बालकांच्या मदतीसाठी असलेल्या शासकीय टोल फ्री क्रमांक १०९८ वर निःसंकोचपणे संपर्क साधावा. कायदेविषयक मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कायम तत्पर आहे.  विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घ्यावी. 
श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राबवित असलेले कार्यक्रम, योजना व उपक्रम  याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना चांगले स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल मार्गदर्शन करून मोकळेपणाने आई-वडिलांसमोर, शिक्षकांसमोर व्यक्त व्हा ! आपल्या अडचणी सांगा ! असे आवाहनही श्रीमती पाटील यांनी व्यावेळी केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबतचे नियमही समजावून सांगितले. विद्यार्थिनी ऋतुजा लांडगे हीने ही आपले विचार व्यक्त केले.  विद्यार्थ्यानी रस्ते नियमांबाबत उत्कृष्ट पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन श्रीमती तबस्सूम शेख व आभार श्रीमती तेजल ढमाले यांनी मानले.  शिक्षक कर्मचारी वृंद, विद्यार्थी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here