मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शरद पवार यांची भेट!!!

0
227
जामखेड न्युज——
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असलं तरी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी पवारांना दिलेली ही अनौपचारिक भेट होती असं सांगण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. याचीच सुरुवात त्यांनी शरद पवारांपासून केल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. मागील दोन दिवसांपासून मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ते रात्री अकराच्या सुमारास महानगरपालिकेमधील आपत्तीव्यवस्थापन कक्षामध्ये आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर तिथून ते थेट शरद पवारांच्या घरी गेले.
पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील ज्येष्ठ नेते आहेत. सत्तासंघर्षामध्ये जरी ते विरोधी बाकावर असले तरी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने शिंदेंनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक गप्पा झाल्या. यावेळी शिंदे हे एकटेच होते, त्यांच्यासोबत इतर कोणीही नव्हते
२१ जून रोजी शिंदे हे काही निवडक आमदारांसोबत सुरतला गेले. त्यानंतर २२ जूनच्या मध्यरात्री हे सर्वजण गुवहाटीला गेले. सातत्याने या बंडखोर गटाकडून राष्ट्रवादीमुळे शिवसेनेच्या आमदारांवर आणि नेत्यांवर अन्याय होत असल्याचे आरोप करण्यात आलेले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीवाटपामध्ये कधीच भेदभाव झाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. राष्ट्रवादीने शिवसेनेचे आमदार बंड करुन गेल्यानंतरही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र उद्धव यांनी २९ जून रोजी राजीनामा दिल्यानंतरच्या सत्तानाट्यादरम्यान शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.
शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते. याकडे लक्ष वेधण्यात आले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी, आमची हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून नैसर्गिक युती आहे. या सरकारला अडीच वर्षे कोणताही धोका नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलदार व मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्री पद मिळाले. आमच्यामध्ये चांगला समन्वय असून मतभेद होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे  अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आमच्या सरकारमागे भक्कमपणे उभे असल्याने सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केलेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here