जामखेड न्युज——
विधानसभा निवडणुकीत जनाधार हा भाजपला मिळाला होता, मात्र महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने तयार झालं आणि आज तेच विश्वासघाताची भाषा करत आहेत. त्यांना ते शोभत नाही. त्यामुळे ते आता सत्तेतून पायउतार होतील असा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात आहे आणि येणाऱ्या आषाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेवर निवड झाल्यानिमित्ताने भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्कार समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राधाकृष्ण विखे म्हणाले की, शिवसेनेचे राज्यातील अस्तित्व हे संपत आहे, एकनाथ शिंदेंच्या रूपाने अतिशय स्वाभिमानी लोक पुढे येत आहे असंही विखे म्हणाले. सोबतच राज्याला चांगलं सरकार देण्याची त्यांची तयारी झाली आहे. भाजपची केवळ वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीच्या फ्लोअर टेस्टची मागणी करण्यात भाजपकडून उशीर होतोय का?असा प्रश्न विखेंना विचारला असता, महाविकास आघाडीतील दोन गटातील वाद सध्या सुरू आहे, न्यायालयात हे प्रकरण आहे. त्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं त्यांनी म्हटलंय.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना आमदार विखे म्हणाले की,संजय राऊत हा काय आता महत्वाचा मुद्दा नाहीये. तो आधीही नव्हता आणि या पुढेही राहणार नाही.
मी तोंड पाहून भविष्य सांगतो- माजी मंत्री कर्डीले
अनेकजण हात पाहून भविष्य सांगतात पण मी तोंड पाहून भविष्य सांगण्याचे काम करतो. मी सहज कोणताही ठराव करत नाही. विधान परिषदेसाठी राम शिंदे यांच्या नावाचा ठराव करत असताना मला खात्री होती की, राम शिंदे यांना उमेदवारी मिळेल म्हणूनच मी त्यांचा ठराव केला असं भाजप नेते माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी म्हटलंय. सोबतच मी पुढचा एक ठराव करतो तो म्हणजे राज्यात भाजपचे सरकार येताच अहमदनगर जिल्ह्याला तीन मंत्रीपदं मिळतील, एक राधाकृष्ण विखे, दुसरं राम शिंदे तर तिसरं म्हणजे मोनिका राजळे. पण तुम्ही सगळे मंत्री झाल्यावर आमच्याकडेही लक्ष ठेवा नाहीतर आम्ही माजी ते माजीच राहू असा टोला कर्डीले यांनी लगावला त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती आपण कधी पाहिली नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटले. पण सत्तेतील 90 टक्के 95 टक्के आमदारांचा जो उद्रेक होता तोच राज्यातील जनतेचा उद्रेक होता असं कर्डीले म्हणाले. तर येत्या 3 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील अशी भविष्यवाणी देखील कर्डीले यांनी केली.




