भरतीसाठी इच्छुकांना सुवर्णसंधी महाराष्ट्रात 7000 पोलीसांची पदभरती 15 जून पासून भरती प्रक्रिया सुरू

0
273
जामखेड न्युज – – – – 
पोलिस दलातील रिक्त जागांसाठी 15 जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, विविध पदांसाठी सात हजार जागा भरण्यात येतील, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतीच केली आहे. 15 हजार जागांसाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर भरती (7000 Police Recruitment In Maharashtra) प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलिस बदल्यांचा विषय चर्चेत आहे. हजारो तरुण पोलिस भरतीच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. गृहमंत्री वळसे पाटील यांनी पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भरती प्रक्रियेची तारीख जाहीर केल्याने पोलिस दलातील सेवेसाठी इच्छुक तरुणांचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘राज्यात 15 जूनपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. गृह विभागाने आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे; तसेच सात हजारांच्या भरती प्रक्रियेला 15 जूनपासून सुरुवात होईल.
पोलिस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणखी 15 हजार पदे भरण्याची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक असून, मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर 15 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे,’ असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या बदल्यांबाबत स्पष्ट केली भूमिका –
‘पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदल्या करण्यात येणार नाहीत; परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे. उपअधीक्षकपदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. बदल्यांसंदर्भात पारदर्शकता पाळली जाईल,’ असे वळसे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here