जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
राजमाता पायलीच्या पन्नास पडल्यात, महाराण्या फुटाफुटावर सापडतील’, असे वक्तव्य चौंडी येथिल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमात माजी आमदार अनिल गोटे यांनी केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या जामखेड येथील आहिल्याप्रेमी व शिवप्रेमींनी जामखेड येथे या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दुपारी तीन वाजता खर्डा चौकात निदर्शने करण्यात येणार आहे.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून चौंडीत हा कार्यक्रम झाला होता. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पवार यांच्या आधी गोंटे यांचे भाषण झाले. त्यांनी सुरुवातीलाच अहिल्यादेवींचा उल्लेख राजमाता किंवा महाराणी असा न करता पुण्यश्लोक असा करावा, अशी सूचना मांडली. मात्र, ही सूचना करताना त्यांची जीभ घसरली. अहिल्यादेवींना फक्त लोकमाता किंवा पुण्यश्लोक म्हणा. त्यांना राजमाता किंवा महाराणी म्हणू नका, असं बोलून तुम्ही त्यांचा अपमान करताय. राजामाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराणी फुटाफुटावर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांच्या या वक्तव्याला कोणीही हरकत घेतली नव्हती. आता मात्र हा मुद्दा गाजू लागला आहे. याच दिवशी चौंडीत येत असलेल्या पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी चौंडीबाहेरच रोखून धरले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर तसेच पवार कुटुंबियांवर टीका केली होती. या प्रकरणी नंतर धनगर समाजातील काही व्यक्तींकडूनच तक्रारी करण्यात आल्या. त्याची दखल घेऊन पोलिसांनी पडळकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता पवार यांच्या उपस्थित गोंटे यांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा पुढे आला आहे. याचा निषेध करण्यासाठी गुरूवारी दुपारी ३ वाजता जामखेडमधील खर्डा चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. यासाठी अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तेथून जामखेड तहसिलदार कार्यालयात जाऊन गोंटे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
परिसरातील शिवप्रेमी व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने अनिल गोटे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे व दुपारी तीन वाजता खर्डा चौकात सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला जाणार आहे अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.



