रोहित पवार सहकुटुंब तीर्थयात्रेला- राजस्थाननंतर यूपीत पोहोचले

0
225
जामखेड न्युज – – – 
राज्यातील नेत्यांच्या देवस्थानांच्या भेटी वाढताना दिसत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. 5 जून रोजी ते अयोध्येला जाणार आहेत. तर मंत्री आदित्य ठाकरे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय. त्यांची दौऱ्याची तारीख निश्चित नसली तरी ते जाणार आहेत हे मात्र नक्की. अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अचानक सहकुटुंब देवदर्शनाला पोहोचले आहेत. राजस्थानची यात्रा केल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. आमदार रोहित पवारांसोबत त्यांचे आईवडील देखील आहेत. विशेष म्हणजे आपल्या या देवदर्शनाचे प्रत्येक अपडेट ते आपल्या फेसबुकवरुन देत आहेत.
रोहित पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून सहकुटुंब ही तीर्थयात्रा सुरु केली आहे. पंढरपुरातून विठ्ठलाचे दर्शन घेत या यात्रेला त्यांनी सुरुवात केली. रोहित पवारांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राला भक्तीची, अध्यात्माची उच्च परंपरा आहे. अनेकदा अचानक अडचणीचा प्रसंग येतो आणि आपण त्यातून सहीसलामत मार्ग काढतो, यामागेही भक्ती आणि अध्यात्माची एक अदृश्य शक्तीच असते, असं माझं मत आहे. त्यामुळंच अध्यात्मावर, ईश्वरावर माझी श्रद्धा आणि भक्ती आहे. विज्ञानाने केवळ भौतिक प्रगती होते, पण विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली तर माणूस सुखी-समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आजच्या प्रगत विज्ञान युगातही मनःशांतीसाठी अध्यात्माचा मार्ग निवडला जातो.
रोहित पवारांनी म्हटलं आहे की, राजकीय, सामाजिक, व्यावसायिक जीवनात काम करत असताना लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसणं हे माझं कर्तव्यच आहे. पण कुटुंबाच्या भक्कम साथीमुळंच आपण काम करत असलेल्या क्षेत्रात यशाची पावलं टाकत असतो. त्यामुळं कुटुंबाकडंही दुर्लक्ष होणार नाही, असा माझा शक्य तेवढा प्रयत्न असतो, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
राज्यातील आणि देशातील प्रत्येक धार्मिक स्थळाचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. ते समजून घेणं, त्यातून काहीतरी नवीन शिकणं असा माझा प्रयत्न असतो. अध्यात्मिक क्षेत्रं ही केवळ लोकांची श्रद्धा जपण्याची ठिकाणं नसतात तर पर्यटनाच्या माध्यमातून त्या परिसराच्या विकासाला चालना देण्याची आणि पर्यायाने तेथील लोकांचं जीवनमान उंचावण्याची मोठी ताकद त्या क्षेत्रांत असते, असं देखील रोहित पवारांनी म्हटलं आहे.
पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनानंतर रोहित पवार सहकुटुंब राजस्थानात पोहोचले.  राजस्थानमध्ये गेल्यानंतर सुरवातीला त्यांनी राधागोविंद मंदिराला भेट दिली. राधा गोविंद मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुष्करच्या ब्रम्ह मंदिराला भेट दिली.  पुष्करला ब्रम्हदेवाचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी महान सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर येथील दर्गा गाठला. त्यानंतर त्यांनी राजस्थानमधील मेहन्दीपूरच्या बालाजी मंदिराला भेट दिली.
राजस्थानहून ते उत्तरप्रदेशात पोहोचले.  वृंदावनला त्यांनी आधी दर्शन घेतलं. त्यानंतर वृंदावनातून ते मथुरेला पोहोचले.  श्रीकृष्ण जन्मभूमीत जाऊन भगवान श्रीकृष्णाचं आई-बाबांसोबत दर्शन घेता आलं, हे खरंतर माझं भाग्यच आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here