जामखेड न्युज – – –
केज तालुक्यातील विडा या गावा जवळील बेंगळवाडी येथे पैशाच्या कारणा करून मुलाने आईच्या मदतीने शेतात पेरणी करण्याच्या तिफनीचा फण वडिलांच्या डोक्यात
मारून केलेल्या दुखापतीमुळे पुणे येथील ससून रुग्णालयात
उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी
मयाताचा मुलगा व पत्नीला घेतले ताब्यात घेतले असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील विडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेंगळवाडी येथे दि. २३ एप्रिल शनिवार रोजी दुपारी ४:०० वा. रमेश सोनाजी शिंदे यास त्याचा मुलगा ऋषिकेश शिंदे आणि पत्नी हिराबाई शिंदे यांनी घर खर्चासाठी पैसे मागितले. परंतु रमेश
त्यांना म्हणाला की, त्याच्याकडे पैसे नाहीत. असे म्हणताच ऋषिकेश व हिराबाई याना त्याचा राग आला. त्या रागाच्या भरात ऋषिकेश याने अंगणात पडलेला तिफणीचा फण उचलून दोन्ही हाताने वडील रमेश शिंदे यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे रमेश याच्या डोक्यातून रक्तस्त्राव
झाला व तो खाली पडला. त्याला सोडवायला रमेशचा भाऊ बाबुराव शिंदे गेले असता त्याला पण मारहाण करण्यात आली. तसेच रमेशला पुन्हा मार म्हणून ऋषिकेशला त्याची आई हिराबाई शिंदे हिने प्रवृत्त केले.दरम्यान जखमी रमेश शिंदे याला त्याचा भाऊ बाबुराव शिंदे यांनी गावकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या मदतीने नेकनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु रमेश शिंदे गंभीर जखमी असल्याने येथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून बीड येथील सरकारी दवाखान्यात पाठविले.
बीड येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रमेश शिंदे यांची तपासणी केली असता त्याला पुणे येथे घेवून जाण्याचा सल्ला दिला. त्या नंतर दि. २४ एप्रिल रविवार रोजी पुणे येथील ससून रुग्णालयात भरती केले.
नंतर दि. २ मे सोमवार रोजी दुपारी ४:०० मृत्यू झाला.
दि. ४ मे बुधवार रोजी रात्री १२:३५ वा. मयत रमेश शिंदे याचा भाऊ बाबुराव शिंदे यांच्या फिर्यादी वरून मयताचा मुलगा ऋषिकेश शिंदे आणि पत्नी हिराबाई शिंदे यांच्या विरुद्ध गु. र. नं. १५१/२०२२ भा. दं. वि. ३०२ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस नाईक उमेश आघाव आणि बाळराजे सोनवणे यांनी
दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना केज न्यायालया समोर हजर केले असता रमेश शिंदे व हिराबाई शिंदे या आई व मुलाला दि. ७ मे पर्यंत चार दिवसांची पोलीस
कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि त्यांचे लेखनिक संतोष गित्ते हे करीत आहेत.









