जामखेड न्युज – – – – –
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत संपुर्ण गाव आपल्या सोबत होते तुम्ही इंजिनिअर आहात, तुमची बौध्दिक पात्रता विकास कामात वापरायला पाहिजे होती, चांगली संस्कृती घडविण्यात वापरायला हवी होती,गावाचा विकास करावा यासाठीच तर आम्ही त्यांना संधी दिली होती, पण त्या उपकाराची जाणीव तर त्यांना नाहीच, पण ते म्हणतात की, आमच्या हिमतीवर निवडून आलोय, अरे मग हिम्मत हाय तर उद्याच्याला आमच्यासमोर एकटा उभा राहून दाखवं, तुला हिम्मत दाखवतो, काय असते ती, मी चॅलेंज स्वीकारतो असे सांगत शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार शहाजी पाटील यांनी सरपंच प्रशांत शिंदेंना ललकारत जोरदार हल्लाबोल केला.
जवळा सोसायटीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दोन्ही गटांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. गोयकरवाडी येथे 14 रोजी सायंकाळी शेतकरी विकास आघाडीची प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार शहाजी पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी मथुरदास गोयकर हे होते. यावेळी पुढे बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, विरोधकांनी निवडणूक लादल्यामुळे संस्थेचं चार ते पाच लाखांचं नुकसान झालं आहे, संस्थेचं आणि सभासदांचं हित विरोधकांकडून पाहिलं गेलं नाही. स्वता:चं महत्व वाढवण्यासाठी आणि स्वता:ला नेता व्हायचं या उद्देशाने विरोधकांकडून सोसायटीची निवडणूक लादली गेली आहे, त्यांना सरपंच करण्यासाठी आम्ही सर्वांनी मदत केली होती, संतराम सुळ सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आम्ही न्याय देऊ शकलो नाहीत, परंतू ह्याला संधी दिली, त्या संधीचं ते सोनं करील असं वाटलं,पण ते निघालं पितळ, गावाचा विकास राहिला बाजूला पण गाव भकास करून ठेवलयं असा आरोप पाटील यांनी केला.
पाटील पुढे म्हणाले की, सोसायटी ही शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे, जेव्हा हे सत्तेत येतील तेव्हा आपल्याला फुकट कर्ज मिळणार नाही, टक्केवारी घेत्येल,धाब्यावर चला म्हणत्येल, तिथं आपण ठरवू, तिथं आपण जेऊ, अश्या पध्दतीने जर आपल्याला वाटप करून घ्यायचं असेल तर त्यांच्याबरोबर जावं सभासदांनी, विरोधकांना भरपुर संधी दिली पण ते आज गावाला चॅलेंज करायला निघालेत, त्यांना वाटतं माझ्यासारखा कोणी नाहीच,पण हे गावयं, गाव करील ते राव करू शकत नाही हे ते विसरलेत, त्यांनी आपली वागायची पध्दत बंद करावी, गावाला वेठीस धरू नये, सर्व सामान्य शेतकऱ्याला वेठीस धरू नये. त्यांना स्वता: वाटतयं की, मी लै हुशार आहे, हुशार आहात ना तुम्ही ? कश्यात? फोडाफोडी करण्यात, तरूण पिढी बिघडवण्यात, कुणाला वाईट मार्गाला लावण्यात यातच तुम्ही हुशार आहात असे टीकास्त्र सोडत हिम्मत असेल तर माझ्या एकट्या विरोधात उभं राहून दाखवं,हिम्मत दाखवायची तर व्यक्तिगत निवडणुकीत उभा राहून दाखवावी, सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरून तू जर हिम्मत दाखवायला निघाला तर मग जनता निवडून कशी देईल असे सांगत माजी चेअरमन शहाजी पाटील यांनी सरपंच प्रशांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.