जामखेड न्युज – – – –
महाराष्ट्रातील तळीरामांनी बियरकडे पाठ फिरवत आपला मोर्चा विदेशी बनावटीच्या मद्याकडे वळवला असून गेल्या 10 वर्षांत राज्यातील विदेशी मद्याच्या विक्रीत दीडपटीने वाढ झाली असताना बियरच्या विक्रीत मात्र 27 टक्क्यांनी घट झाली आहे.
2012-13 या आर्थिक वर्षात 15 कोटी बल्क लिटर विदेशी मद्य रिचवणार्या तळीरामांनी 2021-22 या वर्षात तब्बल 23 कोटी 58 लाख बल्क लिटर विदेशी दारू संपवली. याउलट बियरच्या विक्रीत 31 कोटी 71 लाख लिटरवरून 23 कोटी 13 लाख लिटरपर्यंत घट झाली आहे.
कोरोनामुळे बियर विक्रीला मोठा फटका बसल्याचे सांगितले जाते. कोरोनापूर्वी 2019-20 मध्ये 29 कोटी 3 लाख लिटर विक्री असलेल्या बियरचा खप 2020-21 या कोरोनाच्या वर्षात 20 कोटी 12 लाख लिटरपर्यंत घसरला. त्यात 2021-22 मध्ये मात्र 23 कोटी 13 लाख लिटरपर्यंत वाढ झाली. मात्र कोरोनापूर्वीच्या खपाच्या तुलनेत बियरच्या विक्रीत अजूनही 20 टक्क्यांची घट दिसते आहे. याउलट विदेशी मद्याची विक्री 21 कोटी लिटरहून कोरोनामध्ये 19 कोटी 99 लाख लिटरपर्यंत किरकोळ घसरली होती. मात्र 2021-22मध्ये विदेशी मद्याचा खप 23 कोटी 58लाख लिटरपर्यंत वाढला आहे.
गेल्या दशकातील विदेशी मद्याच्या विक्रीचा हा उच्चांक असून कोरोनाचा अपवाद वगळता बियरच्या विक्रीने गेल्या दशकातील नीचांक गाठला आहे. उत्पादन शुल्क विभागाने 2021-22 मध्ये तब्बल 17 हजार 177 कोटी 19 लाख रुपयांचा महसूल जमा केला. 2019-20 या आर्थिक वर्षी विभागाने 15 हजार 428 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. 2020-21 च्या तुलनेत 2021-22 या नुकत्याच संपलेल्या वर्षात सर्व प्रकारच्या मद्याच्या विक्रीत वाढ झाल्याने महसूलही वाढला.









