जामखेड न्युज – – – –
कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्या वतीने कर्जत शहरांमध्ये सामान्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सर्वसाधारण आजारांसाठी मोफत औषधे देण्यात आली. तसेच हृदयरोग, दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांचे आजार, अस्थीरोग व डोळ्यांशी संबंधित तपासणी व प्रथमोपचार नागरिकांवर मोफत करण्यात आले व त्यांना औषधेही देण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण 458 नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
डोळे तपासणी, मोतीबिंदू, तिरळेपणा, वंधत्व निवारण, ओठ दुभंगणे व फाटलेले ओठ, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास व महिलांचे आजार यांसारख्या विविध आजारांची समस्या असलेल्या नागरिकांची नावनोंदणी या शिबिरांमध्ये करण्यात आली आहे. नाव नोंदणी झालेल्या नागरिकांना त्यांच्या समस्यांशी निगडीत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यास कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने मदत केली जाणार आहे. कर्जतच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराला प्रतिसाद देत या शिबिराचा फायदा करून घेतला. मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी कायम अशा प्रकारची शिबिरे आयोजित केली जातील व नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहेत.