जामखेड न्युज – – –
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) आणि शिवसेना नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. मात्र, सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोघे एकाच सरकारमध्ये असूनही काका-पुतण्यांकडून धुसफूस सुरूच असते. यंदा शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसीगर यांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या (Shivasena) गळाला लागले असून सायंकाळी 6 वाजता त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. गंगाधर घुमरे, फारूक पटेल, नितीन लोढा, अमर नाईकवाडे आणि बाबूशेठ लोढा, अशी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. यामुळे काका शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या आमदार संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का मानला जातोय. तर दुसरीकडे क्षीरसागर काका-पुतण्याचं आघाडीत बिघाडी करत असल्याचीही चर्चा आहे.
ADVERTISEMENT

पोस्टरबाजी करत डिवचलं
बीड शहरात शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाची पोस्टरबाजी करून राष्ट्रवादीला डिवचण्यात आल्याचं दिसून आलंय. राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या गळाला लागल्याने शिवसेना फायदा तर राष्ट्रवादीला धक्का मानला जातोय. हे पाचही जण राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, नितीन लोढा व प्रेमचंद लोढा हे असून ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे शहरात पक्षप्रवेशासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. बीड शहरात या प्रवेशाबाबत जोरदार पोस्टरबाजी करत राष्ट्रवादीला डिवचले आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का
आता शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या बॅनरबाजीवर विचारण्यात आले तेव्हा नगरसेवक अमर नाईकवाडे म्हणाले की, शिवसेनेत आम्ही प्रवेश करणार म्हटल्याबरोबर आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र उस्फूर्तपणे बॅनर लावले. बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या गटाचे प्रमुख फारुख पटेल यांची आक्रमक विरोधक म्हणून बीड नगरपालिकेमध्ये ओळख आहे. त्याचबरोबर नाईकवाडे हे देखील आक्रमक चेहरा आहे. यामुळे हा संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीत नाराजी वाढतेय
बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, संदीप क्षीरसागरांवर घुमरे नाराज असल्याने राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून आता हातात शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा होत आहे.बीड नगरपालिकेतील विरोधी बाकावर बसणाऱ्या नगरसेवक नाईकवाडेंनी मागील दोन अडीच वर्षांमध्ये कायम बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, आता ते भारतभूषण क्षीरसागर यांच्याचं नेतृत्वात काम करण्यासाठी शिवबंधन हाती बांधणार आहेत.





