जामखेड न्युज – – – – – – – –
जामखेड येथे पारधी कुटुंबावरील अत्याचारप्रकरणी विवेक विचार मंचची कठोर कारवाईची मागणी

जामखेड येथील अनुसूचित जमातीतील पारधी समाजाच्या कुटुंबावर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण, निवासी पत्र्याच्या शेडची मोडतोड तसेच जागा बळकावण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी विवेक विचार मंच महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आली.

या प्रकरणी विवेक विचार मंच महाराष्ट्राचे विभाग संयोजक ॲड. प्रबोधन निकाळजे यांनी पीडित पारधी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) प्रवीण लोखंडे तसेच पोलीस निरीक्षक चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जामखेड येथे मागील दहा-बारा वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पारधी जमातीच्या कुटुंबाच्या न्यायप्रविष्ट जागेवरील पत्र्याच्या शेडची काही जातीवादी समाजकंटकांनी मोडतोड केली. संबंधित कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली तसेच जागा बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी फिर्यादी लता रामदास शिंदे (वय ५०, व्यवसाय – मजुरी, रा. बस स्टँडसमोर, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे की, दिनांक ०२/०५/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास त्या घरासमोर नगरपरिषदेचे पिण्याचे पाणी भरत असताना आरोपींनी घरात घुसून मोडतोड, शिवीगाळ व मारहाण केली.

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकरा जणांविरुद्ध विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये वसीम महेबूब शेख, साद शाहादुल शेख (दोघे रा. कोंढवा, पुणे), आयमा अब्दुल शेख (रा. मार्केट यार्ड, पुणे), स्नेहा नितीन कांबळे (रा. हडपसर, पुणे), फरीन नाशीर खान (रा. बिबेवाडी, कोंढवा, पुणे) यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे.



