जामखेड प्रतिनिधी
निवडणुका हे लोकशाहीचे लक्षण आहे. मतदानातून लोकप्रतिनिधी निवडला जातो. परंतु जर आर्थिक प्रलोभन दाखवून मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असेल तर याला लोकशाही म्हणत नाहीत. म्हणून आमदार
रोहित पवारांसह ज्या आमदारांनी आर्थिक प्रलोभन दाखवून आदर्श आचारसंहितेच भंग केला आहे त्या सर्व आमदारांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांची केली आहे.
प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. चौंडी येथे रक्तदन शिबीर, हळगाव येथे ई-रिक्षा वाटप, जामखेड येथे क्रिकेट सामने आयोजन केले होते. यावेळी जामखेड न्युजशी बोलताना शिंदे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. गरजूंना व अडचणीत असलेल्या लोकांना मदत झाली पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
प्रा. राम शिंदे यांनी नविन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या 2020 हे वर्ष संपुर्ण जगाला कोरोना महामारी मुळे अंत्यत वाईट गेले आपण सर्वांनी यावर आता मात केली आहे. काल रोहित पवार यांनी शिंदे यांच्या वर जी टिका केली होती यावर बोलताना शिंदे म्हणाले की, सध्या कर्जत जामखेड काय चालले आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. निवडणूका जर सर्वाच्या संमतीने बिनविरोध होत असतील तर कोणाचाही आक्षेप नाही. आर्थिक प्रलोभन दाखवणे हे लोकशाही विरोधी आहे. निवडणूका हे लोकशाहीचे लक्षण आहे. निवडणूका न होणे दाबाखाली होणे याला लोकशाही म्हणत नाहीत. सध्या बिनविरोध निवडणूकीसाठी दबावतंत्र व आर्थिक प्रलोभने दाखवले जात आहे हे लोकशाही विरोधी आहे तेव्हा बिनविरोध निवडणूकांसाठी आमदार रोहित पवार यांच्यासह ज्या ज्या आमदारांनी आर्थिक प्रलोभने दाखवली आहेत त्या सर्व आमदारांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंदे यांनी केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत गेल्या तीन दिवसांपासून आमदार रोहित पवार व राम शिंदे यांचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
चौकट
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचा आज वाढदिवस त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांना ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे गावागावांत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गट तट तयार करणार्या कार्यकर्त्यांसाठी हा चांगला संदेश आहे.