जामखेड न्युज——
खासदार विखे विरुद्ध आमदार लंके खडाजंगी
नगर जिल्ह्यातील राजकारणात विखे गटाचे महत्त्व हे सुरुवातीपासूनच राहिलले आहे. या गटाच्या शक्तीला वेसण घालण्याचे काम शरद पवार यांच्याकडून सातत्याने केले जाते. या अंतर्गतच आता नगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून आतापासूनच पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना बळ दिले जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे यांना महसूल मंत्री पदासारखे महत्त्वाचे पद मिळाल्यानंतर त्यांच्यासह त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सध्या जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे खासदार विखे व राष्ट्रवादीचे आमदार लंके यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.
लंके यांना राष्ट्रवादीतील वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने त्यांना जिल्हा राष्ट्रवादीमध्ये मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना बाजूला करत वरिष्ठांकडून त्यांचे महत्त्व तयार करण्यात आलेले आहे. याशिवाय राष्ट्रवादीकडून लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव पुढे केले जात आहे. आमदार लंके त्याबद्दल भूमिका स्पष्ट करत नसले तरी त्यांचा स्वतःचा नगर-पारनेर मतदारसंघ सोडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील इतर तालुक्यातून सुरू असलेल्या भेटीगाठी मात्र ते निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विखे विरुद्ध आमदार लंके यांची लढत होऊ शकते, या दृष्टीनेही दोघांतील आरोप-प्रत्यारोपांकडे पाहिले जात आहे.
या वादाला कारण ठरले ते नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघातील ‘जलजीवन मिशन’ कार्यक्रमातील पाणीयोजना मंजूरच्या श्रेयवादाचे. खासदार विखे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीयोजना आम्हीच मंजूर केल्याचा दावा केला होता. त्यापूर्वी खासदार विखे यांनी पारनेरमध्ये दौरा करताना, सरकारच्या निधीतून करोना केंद्र चालवून स्वतःची प्रसिद्धी केली जाते, पारनेरमधील दादागिरी मोडून काढू अशी वक्तव्ये केली होती. पारनेरमधील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी उपोषणाचा इशाराही दिला होता.
महसूल मंत्रीपद मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे व खासदार विखे यांनी नगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते पळवत आहेत, त्याविरुद्ध आपण लढा देणार आहोत, असे सांगत आपला राष्ट्रवादीच्या विरोधातील इरादा स्पष्ट केला होता. त्याला विखे विरुद्ध अजित पवार यांच्यातील वादाचाही संदर्भ आहे. पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील पाणी नगर व श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील साकळाई पाणी योजनेसाठी मिळायला हवे. पण राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील नेतेच पाणी मिळू देत नाहीत, त्यांची मनमानी आपण मोडून काढू, असा हल्लाबोल त्यांनी केला होता.
कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर या मतदारसंघांचा समावेश होतो. त्यातील श्रीगोंद्यात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते आहेत, तर कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी मात्र याबद्दल विखे पितापुत्रांचा फारसा प्रतिवाद केला नाही. आमदार लंके यांनी मात्र प्रत्युत्तर दिले होते. त्यातूनच विखे व लंके यांच्यातील वादाची ठिणगी पेटली आहे.