बालकिर्तनकार ते Engineer व आता PSI – शेतकऱ्याच्या लेकीचा संघर्षमय प्रवास

0
255
जामखेड न्युज – – – – 
गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या आणि आतुरतेने वाट बघत असलेल्या MPSC च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी MPSC ने जाहीर केली आहे. यामध्ये अनेक कष्टकरी आणि शेतकऱ्यांची मुलं यशस्वी झाली आहेत. यामध्ये नाशिक येथील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून कीर्तन करणाऱ्या रुपाली शिवाजी केदार या शेतकऱ्याच्या लेकीने आपली मोहोर उमटवलीय. नाशिक मधील सिन्नर तालुक्यातील दोडी हे तिच गाव. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या रुपलीने वयाच्या 9 व्या वर्षी घर सोडलं. घरी अध्यात्माचा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा. आई वडलांच्या इच्छेनुसार चौथीत असताना तीने आळंदी गाठली. मग सुरू झाला अध्यात्माचा प्रवास. अध्यात्मिक अभ्यासाबरोबरच त्यावेळी नोकरीनिमित्त आळंदीत असलेले रूपालीचे चुलते मनोहर केदार यांच्या मार्गदर्शनात तिचे नियमीत शिक्षणदेखील सुरुच होते.
त्यानंतर ओझर ता. संगमनेर येथे तात्या थोरात यांच्या मदतीने व हभप निवृत्ती म. इंदोरीकर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तिने अध्यात्माचे पुढील शिक्षण घेतले. अध्यात्माचे धडे गिरवत असताना तिच्या मनातील शिक्षणाची आवड कायम होती. वयाच्या 13 व्या वर्षी कीर्तन व प्रवचनास सुरवात तीने केली. बालकीर्तनकार म्हणून तिला लोकं ओळखायला लागले. त्यानंतर अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. 12 वी पर्यंत हभप राजाराम म.आव्हाड यांचं मार्गदर्शन आणि मदत तिला लाभली.बारावीनंतर नाशिक मधील सपकाळ महाविद्यालयात तिने Electronics and Telecommunication इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला. इंजिनीअरिंग चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.
हे सगळं सुरू असताना कीर्तनही सुरूच होतं. कीर्तनामुळे शिक्षणासाठी आर्थिक मदत होत होती. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात नाशिक येथील युनिव्हर्सल फाऊंडेशनचे राम खैरनार यांचे मार्गदर्शन तिला लाभले तसेच नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले तिचे काका संतोष केदार यांचीदेखील तिला खूप मदत झाली. अशातच सन 2017 मध्ये तीचा नितीन सानप यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतरही तिने अभ्यास सुरूच ठेवला. यामध्ये तिच्या पतीनेही खूप मदत आणि पाठिंबा दिला. 2018 मध्ये तिने MPSC ची पहिली पूर्वपरीक्षा दिली. पण यश मिळालं नाही. परंतु अपयशाने खचून न जाता जोमाने अभ्यास सुरू ठेवला.
2019 मध्ये झालेल्या पुर्व व मुख्य परीक्षेत तिला यश मिळत गेलं. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन समाजप्रबोधन करण्याचं काम सुरूच होतं. हे करत असताना आपण दोन्हीपण गोष्टी साध्य करू शकतो हे तिने दाखवून दिलं. त्यानंतर परीक्षेच्या मुलाखतीत कीर्तनाचा चांगल्या पद्धतीने उपयोग तिला झाला. आणि या यादीत PSI पदावर तिने आपली मोहोर उमटवली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी घर सोडून राहिले. आठवीत असताना पाहिलं कीर्तन केलं, पण विज्ञानाची आवड होती. त्यामुळं विज्ञानाची अध्यात्माला जोड दिली आणि समाजप्रबोधन करत गेले. माझ्या या वाटचालीत मला खूप जणांचे सहकार्य लाभले लग्नानंतर पतीनेदेखील खूप पाठिंबा दिला. ह्या संपूर्ण प्रवासात एक दृश्य कायम माझ्या नजरेसमोर होतं ते म्हणजे रात्रंदिवस आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी शेतामध्ये राबणारी व आपल्या लेकीच्या यशाची चातकासारखी वाट पाहत असलेली माझी आई. केवळ तेवढ्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकले. माझे आजचे हे यश मी माझ्या आईला व माझ्या पतीला समर्पित करते.- रुपाली केदार सानप (PSI पदासाठी निवड झालेली उमेदवार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here