जामखेड न्युज – – – – –
सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनता जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा किताब बहाल केला. महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशह आणि सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले. अशा या जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या दहा गोष्टी तुम्हाला माहितीच असायला हव्यात…
शिवरायांचा जन्म-शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली. सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले.गनिमी कावा-शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर अत्यंत चाणाक्ष पद्धतीने केला. गनिमी कावा हे एक युद्धतंत्र आहे. महाराष्ट्रातील डोंगर-दऱ्यांचा योग्य पद्धतीने वापर करत शिवरायांनी बलाढ्य शत्रूलाही गनिमी काव्याच्या माध्यमातून धूळ चारल्याचे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.आरमाराची स्थापना-महाराष्ट्राला शेकडो कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे शत्रू समुद्रामार्गेही हल्ला करू शकतो, हे शिवरायांनी नेमकेपणाने हेरले होते. स्वराज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. ज्याचं आरमार त्याचा समुद्र, असे धोरण शिवाजी महाराजांनी राबवले. कोकण किनारपट्टीवर अनेक जलदुर्ग उभारून स्वराज्याच्या सीमा संरक्षित केल्या. मायनाक भंडारी या समाजाला आरमाराची सुभेदारी दिली. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच मानायला हवेत.
शिवाजी महाराजांचे गड-किल्ले-शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक एक गड-किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतीक आहेत.पहिली स्वारी – तोरणगडावर विजयइ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांचे असताना शिवाजीमहाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच वर्षी शिवाजीमहाराजांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.राज्याभिषेक-६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीमहाराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीमहाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले.
अष्टप्रधान मंडळ-शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अनन्य साधारण होते. या अष्टप्रधान मंडळात ८ मंत्री होते. ३० विभागांत त्यांचे काम विभागलेले होते. या ३० विभागातील कामाच्या व्यवस्थापनासाठी ६०० कर्मचारी नेमण्यात आले होते. महाराजांसमोर येणाऱ्या प्रकरणांचा समोरासमोर निकाल लावला जात असे. रायगडावर कामासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती भोजन केल्याशिवाय गडउतार होत नसे.राजमुद्रा-छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” याचा अर्थ मराठीत असा होतो की, “ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.शिक्षा व कठोर प्रशासन-शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्यांना व त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती. महिलांना त्रास देणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी कडक शासन केल्याची अनेक उदाहरणे देता येतील. शिवाजी महाराजांच्या दरबारात सुनावणीसाठी आलेले प्रकरण तातडीने, समोरासमोर तडीस नेले जायचे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शेकडो गड-किल्ले होते. सर्व गड-किल्ल्यांचे कामकाज नेमकेपणाने चालायचे. नेमून दिलेल्या कामात केलेली हयगय महाराज खपवून घेत नसत.
हेही वाचा: “मुस्लीम शिवजयंतीला येतात का? छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचेच राजे”
पर्यावरणरक्षक छत्रपती शिवाजी महाराज-शिवाजीमहाराजांचे आज्ञा सांगणारे राजपत्र रामचंद्रपंत आमात्य यांनी लिहून ठेवले आहे. त्यात शिवाजीराजे म्हणतात, ‘‘आरमारासाठी जर लाकडे आवश्यक असतील तर हुजुराची परवानगी घेऊन सागवान घ्यावे किंवा परमुलुखातून खरेदी करून आणावीत.’’ स्वराज्यातील किंवा परराज्यातील लाकूड रीतसर मार्गाने आणावीत, अवैध मार्गाने आणू नयेत, अशा सक्त सूचना शिवाजीमहाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या. पुढे ते सांगतात, ‘‘स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून लाकडे आरमारासाठी अत्यंत उपयुक्त असतात, परंतु त्यास हात लावू नये. कारण ती एक-दोन वर्षात येत नाहीत, रयतेने त्यांना आपल्या मुलांप्रमाणे वर्षानुवर्षे अगदी अनादी काळापासून जपलेली असतात, वाढवलेली असतात. झाडे तोडली तर धन्याच्या (राज्याच्या राज्यकर्त्याच्या) पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो, असे शिवाजीराजे म्हणतात. झाडांची कत्तल म्हणजे प्रजेला पीडा देणे होय, असे शिवाजीमहाराजांचे मत आहे. लाकूड हवे असेल तर एखादे झाड खूप जीर्ण (जुने) झालेले असेल व ते कामातून गेले असेल तर ते त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याला योग्य आर्थिक मोबदला देऊन, त्याला आनंदी करून तोडू द्यावे. बळजबरीने ते घेऊ नका.’’अशा स्पष्ट सूचना शिवाजीराजांनी दिलेल्या आहेत.