जामखेड न्युज – – – –
कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील नितीन अंकुश पोटरे (वय ३५) या युवकाचा खून झाला असून त्याच्या मित्रांनीच घात केल्याचा संशय आहे. आनंद बबन परहर व जावेद अरबाज शेख (रा. पिंपळवाडी) यांनी कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये बुडवून निर्घृणपणे खून केल्याचा संशय बळावत आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये महेश अंकुश पोटरे यांच्या फिर्यादीवरून दोघांच्या विरोधात कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही २६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
महेश पोटरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, २३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नितीन पोटरे हा घरामधून मी आनंद परहर व जावेद शेख या दोन मित्रांकडे जाऊन येतो असे म्हणून घराच्या बाहेर पडला. मात्र तो घरी परत आलाच नाही. रात्री उशिरा घरातील नातेवाईक नितीनला फोन करत होते, परंतु त्याचा फोनही लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय पोटरे व इतर नातेवाईकांनी नितीन याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नाही.
दरम्यान, जावेद शेख यांनी नितीनची मोटरसायकल घरी आणून लावली व सांगितले की, मी, नितीन व आनंद हे तिघेजण रात्री बरोबरच होतो, आम्ही तिघेही दारू पिलो होतो. मात्र मी नितीनची गाडी घेऊन पुढे आलो असून नितीन खूप दारू पिला असल्यामुळे तो आनंद परहर याच्यासोबत होता. मला काही माहिती नाही. त्यानंतर याप्रकरणी आनंद परहर यास विचारणा केली असता त्याने सांगितले की, रात्री नऊ वाजता मी नितीन यास जावेद शेख यांच्या घराजवळ सोडले आहे. तिथून पुढे तो कुठे गेला मला माहिती नाही.
त्यानंतर नातेवाईकांनी नितीन हा आनंद परहर व जावेद शेख यांच्यासोबत गेला होता, तो घरी परत आला नाही अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. दरम्यान २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता तळवडी शिवारामध्ये येसवडी कुकडी कॅनॉलमधील पाण्यामध्ये नितीन पोटरे यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. मात्र मृतदेहाची ओळख पटली आणि परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. मयत नितीन तसेच आनंद आणि जावेद हे तिघे चांगले मित्र होते. ते या घटनेच्या आधी एकत्रित दारू पिलेले होते. मग असे असताना नितीनचा खून या दोन मित्रांनी केला का? याबाबत गूढ कायम आहे.