Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे खर्डा येथिल सिताराम गड व गीतेबाबा देवस्थानास “ब”...

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे खर्डा येथिल सिताराम गड व गीतेबाबा देवस्थानास “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

0
269
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – 
श्री संत भगवान बाबांचे गुरू असलेले संत श्री गीते बाबा यांचे समाधी स्थळ तालुक्यातील खर्डा, या ठिकाणी आहे. संत श्री भगवान बाबा यांना मानणारा भक्तांचा मोठा जनसमुदाय आहे. या भक्तांसह इतरही भक्तगण खर्डा येथील स्थित संत श्री गिते बाबा व श्री संत सिताराम बाबा यांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी खर्डा येथे देखील येत असतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान व निवडणुकीनंतरही खर्डा येथे आ.रोहित पवार व सामान्य जनतेच्या सहकार्यातून गिते बाबा यांच्या मंदिराच्या विकासाचे काम सुरू होते. या दरम्यान लोकांची भावना होती की या समाधी स्थळाला ‘ब’ दर्जा मिळावा. ही भावना समजून घेत आ. रोहित पवार यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू केला.
                         ADVERTISEMENT
 
मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधांचा विकास न झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच भक्ती स्थळाचे पावित्र्य राखणे देखील शक्य होत नव्हते. संत श्री भगवानबाबांची पालखी खर्डा येथे मुक्कामी आल्यानंतर त्यांच्या आश्रयाची होत असलेली गैरसोय पाहून आ. रोहित पवार यांना वाईट वाटले आणि हीच गोष्ट आमदार रोहित पवार यांनी हेरली व या दोन्ही महान संतांच्या तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा करिता जिल्हा प्रशासन व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
त्यानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी ‘ब’ वर्ग दर्जासाठीची मान्यता मिळालेली असून यातून या ठिकाणी अनेक विकास कामे करता येणार आहेत. या विकास कामांच्या माध्यमातून येथे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून त्यांना या ठिकाणी विविध सोयी-सुविधा उपलब्ध देता येणार आहेत व त्यातूनच या दोन्ही तीर्थक्षेत्रांचं पावित्र्य राखण्यास देखील मदत होणार आहे. सोबतच खर्डा येथे वाढत्या पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, यात काही शंकाच नाही. त्याचबरोबर खर्ड्यापर्यंत आलेल्या पालखी मार्गाला खर्डा ते पंढरपूर नेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांची आ. रोहित पवार यांनी तीन वेळा भेट घेतली आहे. तसेच या प्रयत्नांना ही लवकरच यश मिळेल असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
मागील लोकप्रतिनिधी अनेक खात्यांचे मंत्री असतानाही त्यांचा शब्द फक्त राजकीय आश्वासनापुरताच मर्यादित राहिला. पण आ.रोहित पवारांनी जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला त्याबद्दल जनता समाधान व्यक्त करत आहे. आमदार रोहित पवार यांच्या या दूरदृष्टीचे व संतांप्रती असलेल्या आस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!