जामखेड न्युज – – –
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर व नगर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा तसेच एका शिक्षकाचा समावेश आहे.
केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा गेल्या आठवड्यात पार पडल्या. या परिक्षांसाठी जिल्ह्याच्या विविध भागातील विद्यार्थी परीक्षेसाठी नवोदय विद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते. या विद्यार्थ्यांकडून करोना संसर्गाचा फैलाव झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुरुवारी नवोदय विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांमध्ये करोना संसर्गाची लक्षणे आढळल्याने त्यांची टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. या तपासणीत या ९ विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नवोदय विद्यालयातील सर्व ४१० विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांची करोना तपासणी करण्यात येत आहे. आज शुक्रवार (दि. २४) एकूण २०० विद्यार्थी व शिक्षकांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १० विद्यार्थी व एक शिक्षकाला करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नवोदय विद्यालयातील करोना बाधितांची संख्या २० झाली आहे. या सर्वांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाल्याचे समजल्यावर पालकांनी विद्यालयात धाव घेतली. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालकांची विद्यालयात गर्दी केली.
दरम्यान, टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षकासह २० विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने विद्यालयाचे वर्ग सात दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. इतर शैक्षणिक उपक्रम मात्र सुरू राहणार आहेत. विद्यालयाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय अशी सुमारे ४५० जणांची करोना तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली.









