जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट.)
जामखेड तालुक्यात गेल्या १० ते १५ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये पावसामुळे सोयाबीन आणि कांदा उगल्यानंतर जळून गेला, तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर शेतात ठेवलेले पीक वाहून गेले आहेत. तसेच काही पिके जागीच सडून गेले आहेत. तालुक्यातील पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची ‘युक्रांद’ (युवक क्रांती दल) संघटनेने तहसीलदारांकडे मागणी केली.

यांसंबधीचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी सादर केले. राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ भागात अतिवृष्टी झाली आहे. जामखेड तालुका हा मराठवाडा सीमेवर येत असल्याने डोंगरमाथा आणि जामखेड शहर परिसरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने निकष आणि अटींचा विचार न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे. तालुका कृषी अधिकारी सुपेकर यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. यावेळी विशाल नेमाने, विजय घोलप, अजय नेमाने, ब्रह्मदेव कोल्हे, श्रीकृष्ण कोल्हे, अनिल घोगरदरे, विनीत पंडित, योगेश अब्दुल्ले हे तरूण उपस्थित होते.
तहसीलदार चंद्रे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शेतातील छायाचित्र काढावेत. प्रशासन स्तरावर पंचनाम्यांचा निर्णय जाहीर होताच, त्या छायाचित्रांची मदत घेता येईल.
कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले की, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता, अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहिती भरावी किंवा विमा प्रतिनिधींकडे पीक नुकसान सूचना फॉर्म सादर करावा.