जामखेड न्युज – – –
उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात सध्या एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. कारण या लग्नात वधू 75 तर वर 90 वर्षांचा आहे. खुद्द वराच्या मुलींनी हे लग्न ठरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात 90 वर्षीय शफी अहमद यांना पाच मुली आहेत. शफी यांच्या पाचही मुलींची लग्न झाली असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी असावे अशी त्यांच्या मुलीची इच्छा होती. त्यासाठी पाच मुली आणि जावयांनी मिळून शफी यांचे लग्न करण्याचे ठरवले. त्यासाठी 75 वर्षी आयशा यांच्याशी लग्न ठरवले. आयशा यांना एक नातू आणि मुलगी आहे.
या लग्नामुळे शफी आणि आयशा दोघांनाही आधार मिळाला आहे. आपले वडील एकटे असतात, त्यांना जेवण द्यायला आणि त्यांची काळजी घेणारे कोणी नाही अशी खंत शफी यांच्या मुलींना होती. नेहमीच सासरहून येऊन वडिलांची काळजी घेणे शक्य नसल्याने त्यांनी वडिलांचे लग्न लावून दिल्याचे सांगितले.
तसेच या लग्नामुळे आयशा यांनाही आधार मिळाला आहे. आयशा यांना एक मुलगी असून एक नात आहे. जावयाचे निधन झाल्याने मुलगी आणि नात दोघेही त्यांच्याकडे राहतात. आयशा यांनी लग्न केल्यामुळे त्यांची मुलगी आणि नातीलाही हक्काचे घर मिळाले आहे.




