जामखेडच्या मातीत पिकलेला कांदा आता थेट सातासमुद्रापार परदेशी बाजारपेठेत आपली चव आणि गुणवत्ता दाखवणार आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातून सोमवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी कांद्याचा एक कंटेनर परदेशी बाजारपेठेकडे रवाना करण्यात आला. दुबई, कतार, ओमान, बरकतसह अन्य देशांमध्ये जामखेडचा कांदा पोहोचत असल्याने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचे नवे दालन खुले होत आहे.
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याच्या निर्यातीमुळे मोठा आधार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील परवानाधारक जीवनदास ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कांदा परदेशी बाजारपेठेत पाठविण्यात येत आहे. यापूर्वीही जामखेड बाजार समितीतून कांदा दुबईला निर्यात करण्यात आला होता. आता पुन्हा एक कंटेनर परदेशी बाजारपेठेकडे रवाना झाल्याने जामखेडच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणारी मागणी अधोरेखित झाली आहे.
दि. २४ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या आवारात कंटेनरची विधिवत पूजा करून, नारळ फोडून कांद्याच्या निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती शरद (दादा) कार्ले, बोर्ला गावचे माजी सरपंच जालिंदर चव्हाण, बाजार समितीचे संचालक राहुल बेदमूथा, जीवनदास ट्रेडिंग कंपनीचे मालक तसेच कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामखेडच्या कांद्याला देश-विदेशात मागणी जामखेड बाजार समितीतील कांद्याला देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी मिळत आहे. कांद्याला मिळणारा चांगला भाव आणि निर्यातीच्या संधी यामुळे जामखेड तालुक्यासह परिसरातील चार ते पाच तालुक्यांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. कांद्याच्या आवकेतही लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य वजन, पारदर्शक व्यवहार, चांगला बाजारभाव, त्वरित पेमेंट आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजार समितीवरील विश्वास वाढत असून, शेजारील तालुक्यांतील शेतकरीही जामखेड बाजार समितीला पसंती देत आहेत.
दुष्काळात कांद्याचा आर्थिक आधार जामखेड तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाण्याची टंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत जामखेडच्या कांद्याला देश-विदेशात मागणी मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
कांद्याची निर्यात वाढल्यास स्थानिक बाजारपेठेला चालना मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मालाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जामखेड बाजार समितीच्या माध्यमातून कांदा निर्यातीचा हा उपक्रम तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी बाजार समितीतच शेतमाल विक्रीस आणावा : शरद कार्ले जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, जामखेड बाजार समितीतील कांद्याला देश-विदेशात चांगली मागणी असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी आपला कांदा तसेच भुसार शेतमाल बाजार समितीच्या आवारात विक्रीस आणावा. बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांशी व्यवहार करून पारदर्शक पद्धतीने शेतमालाची विक्री करावी.
जामखेडच्या कांद्याने परदेशी बाजारपेठेत घेतलेली ही झेप तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरत आहे. स्थानिक बाजारपेठेतून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचणाऱ्या जामखेडच्या कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला नवी दिशा मिळत असून, दुष्काळाच्या संकटात आर्थिक बळ देणारा हा उपक्रम ठरणार आहे.