बाटलीबंद पाण्याच्या बाजारात खळबळ! बिसलेरीच्या एका बॅचवर FSSAI ची कारवाई, नागपूर अधिवेशनात प्लास्टिक बाटल्यांनाही ‘ब्रेक’!
बाटलीबंद पाणी म्हणजे सुरक्षित पाणी, असा ग्राहकांचा विश्वास असताना देशातील प्रसिद्ध बिसलेरी ब्रँडच्या एका विशिष्ट बॅचच्या पाण्याच्या नमुन्याबाबत अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) गंभीर कारवाई केली आहे. गोव्यातील उत्पादन केंद्रातून घेतलेल्या नमुन्यात सुरुवातीच्या तपासणीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ब्रोमेट आढळल्याचे समोर आले. त्यानंतरच्या संदर्भ प्रयोगशाळेच्या तपासणीत पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याने संबंधित बॅचच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणात कंपनीविरुद्ध खटला चालवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र, या कारवाईमुळे संपूर्ण बिसलेरी ब्रँडवर बंदी आलेली नाही. कंपनीनेही ही कारवाई केवळ २७ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा प्लांटमध्ये तयार झालेल्या GO 270 या विशिष्ट बॅचपुरती मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, याचवेळी नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्लास्टिकच्या लहान पाण्याच्या बाटल्यांचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेपासून ते प्लास्टिकच्या वाढत्या कचऱ्यापर्यंत दोन महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले आहेत.
बिसलेरीच्या पाण्याच्या नमुन्यात नेमके काय आढळले? FSSAI कडून करण्यात आलेल्या तपासणीत गोवा येथील बिसलेरी उत्पादन केंद्रातील एका नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याचे सांगण्यात आले.
निर्धारित मर्यादा : १० मायक्रोग्रॅम प्रति लिटर प्राथमिक तपासणीतील प्रमाण : १२ मायक्रोग्रॅम प्रति लिटर यानंतर कंपनीने आक्षेप घेत नमुन्याची पुढील तपासणी करण्याची प्रक्रिया अवलंबली. संदर्भ प्रयोगशाळेच्या अहवालात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असल्याचे नमूद झाले; मात्र त्याच नमुन्यात PAHs या रासायनिक घटकांची नोंद झाली. या निष्कर्षांच्या आधारे FSSAI ने संबंधित बॅचला असुरक्षित घोषित करून विक्री प्रतिबंधित केली.
PAHs या रासायनिक समूहातील काही घटक कर्करोगाच्या जोखमीशी संबंधित आहेत. त्यामुळे या तपासणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बिसलेरी कंपनीने काय दिले स्पष्टीकरण? या प्रकरणावर कंपनीने आपली बाजू मांडताना ग्राहकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होऊ नये, असे आवाहन केले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, संबंधित कारवाई केवळ GO 270 या एका बॅचपुरती असून, ही बॅच २७ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा प्लांटमध्ये तयार करण्यात आली होती. कंपनी वर्षभरात ५० हजारांहून अधिक बॅच तयार करते. त्यामुळे एका बॅचच्या तपासणीवरून संपूर्ण उत्पादनाबाबत निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने पुढे असेही स्पष्ट केले आहे की, संबंधित बॅचचा साठा सध्या बाजारात उपलब्ध नाही. तिचे सर्व १४३ उत्पादन प्रकल्प सुरू असून, त्यानंतरच्या उत्पादनांच्या नमुन्यांनी निर्धारित निकष पूर्ण केल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच PAHs संदर्भातील तपासणी निष्कर्षांबाबत कंपनीने विसंगती असल्याचे सांगत फेरतपासणीची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणात नियामक संस्थेची भूमिका आणि कंपनीचे स्पष्टीकरण या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.