Monday, November 23, 2026
Home ताज्या बातम्या शंभूराजांचा शौर्यइतिहास पुस्तकबद्ध! काजल जंजिरे यांचा धर्मवीर गडाचा वारसा जपण्याचा पुढाकार! ...

शंभूराजांचा शौर्यइतिहास पुस्तकबद्ध! काजल जंजिरे यांचा धर्मवीर गडाचा वारसा जपण्याचा पुढाकार! ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी जनजागृतीची गरज, काजल जंजिरे यांचे प्रतिपादन.

0
2
शंभूराजांचा शौर्यइतिहास पुस्तकबद्ध! काजल जंजिरे यांचा धर्मवीर गडाचा वारसा जपण्याचा पुढाकार!  ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी जनजागृतीची गरज, काजल जंजिरे यांचे प्रतिपादन.

जामखेड न्युज – – – – – – 

शंभूराजांचा शौर्यइतिहास पुस्तकबद्ध! काजल जंजिरे यांचा धर्मवीर गडाचा वारसा जपण्याचा पुढाकार!

ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी जनजागृतीची गरज, काजल जंजिरे यांचे प्रतिपादन.

छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडाचा गौरवशाली इतिहास आता पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर येणार आहे. लेखिका तथा प्रसिद्ध वास्तुविशारद सौ. काजल महेश जंजिरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने धर्मवीर गडाचा इतिहास, त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचे विविध पैलू शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते धर्मवीर गडाच्या ऐतिहासिक परिसरात उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना लेखिका काजल जंजिरे यांनी ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी समाजात जागृती निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, “इतिहास जतन करणे म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचे संरक्षण करणे नव्हे, तर त्या वास्तूंशी जोडलेले सत्य, स्मृती, संस्कृती आणि ऐतिहासिक संदर्भ यांचेही जतन करणे होय. ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व नव्या पिढीला समजले, तरच त्यांच्या संवर्धनासाठी समाज पुढे येईल. त्यामुळे ऐतिहासिक वारशांविषयी जनजागृती होणे ही काळाची गरज आहे.”
पेडगावच्या रहिवासी असलेल्या काजल जंजिरे यांनी धर्मवीर गडाच्या इतिहासाचा अभ्यास करून हे पुस्तक साकारले आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या काष्टी गावच्या त्या सुकन्या, तर आमदार हेमंत ओगले यांच्या पेडगाव गावच्या स्नुषा आहेत. पुस्तक निर्मितीच्या प्रवासातील विविध अनुभव त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडले. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे विविध पैलू आणि धर्मवीर गडाचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पुस्तकाच्या निर्मितीच्या प्रवासात पती महेश ईश्वर जंजिरे यांचे मोलाचे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले. केंद्रीय राखीव पोलीस दलात सहाय्यक कमांडंट या पदावर कार्यरत असलेल्या पतीने दिलेला भक्कम पाठिंबा, तसेच सासू-सासरे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळेच हा ऐतिहासिक दस्तऐवज साकारता आला, अशी भावना काजल जंजिरे यांनी व्यक्त केली.

आमदारांकडून लेखिकेच्या कार्याचे कौतुक!
पुस्तक प्रकाशनप्रसंगी आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि आमदार हेमंत ओगले यांनी लेखिका काजल जंजिरे यांचे विशेष कौतुक केले. काजल यांनी आपल्या लेखणीतून धर्मवीर गडाचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार हेमंत ओगले म्हणाले की, धर्मवीर गडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची माहिती राज्यभर पोहोचली पाहिजे. यासाठी राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांपर्यंत या पुस्तकाच्या माध्यमातून धर्मवीर गडाचा इतिहास पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी काष्टी गावची लेक असलेल्या काजल जंजिरे यांचा अभिमान व्यक्त केला. त्या सिद्धहस्त लेखिका, चाणाक्ष संशोधक आणि उत्कृष्ट वास्तुविशारद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. धर्मवीर गडाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

इतिहासप्रेमी, साहित्यिक आणि मान्यवरांची उपस्थिती!
या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ नेते अॅड. डी. डी. घोरपडे, इतिहासकार प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष जयंत येलूलकर, कवी चंद्रकांत पालवे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, निवृत्त आयपीएस अधिकारी हेमंतराजे गायकवाड, पेडगावचे सरपंच इरफानभाई पिरजादे आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

गणराज प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाला वरिष्ठ पत्रकार तथा मुंबई उच्च न्यायालयातील वकील डॉ. बाळासाहेब बोठेपाटील यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाच्या निर्मितीसाठी गणराजचे संचालक प्रा. गणेश भगत, क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्सचे संचालक व ज्येष्ठ संपादक जयंतराव देशपांडे आणि गणेश मुद्रणालयाचे संचालक गणेशसेठ दळवी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभल्याचे लेखिका जंजिरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. डॉ. बाळासाहेब बोठे पाटील यांनी केले. लेखिका काजल जंजिरे यांचे सासरे ईश्वर जंजिरे, सासू सुनीता जंजिरे, वडील सुनील दरेकर, आई अश्विनी दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जंजिरे आणि युवा नेते महेश दरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पत्रकार विशाल चव्हाण यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली, तर प्रा. डॉ. गणेश भगत यांनी आभार मानले.

९० एकरांतील ऐतिहासिक वैभवाची मान्यवरांकडून पाहणी!
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी सुमारे ९० एकर क्षेत्रात विस्तारलेल्या धर्मवीर गड परिसरातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि विविध ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली. या ऐतिहासिक ठेव्याची माहिती जाणून घेताना उपस्थितांनी गडाच्या संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली.

एकीकडे इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याचे आव्हान असताना दुसरीकडे त्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम काजल जंजिरे यांनी केले आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे धर्मवीर गडाच्या ऐतिहासिक वारशाला व्यापक ओळख मिळण्यास मदत होणार असून, इतिहासप्रेमी आणि नव्या पिढीसाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!