मुक्या जीवांसाठी मायेचा ओलावा! पिंपरखेडमध्ये वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी पाच पानवटे, दुष्काळ संपेपर्यंत पाण्याचे नियोजन! दिगंबर ढवळे यांचा स्तुत्य संकल्प, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुक्या जीवांसाठी मायेचा ओलावा! पिंपरखेडमध्ये वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी पाच पानवटे, दुष्काळ संपेपर्यंत पाण्याचे नियोजन!
दिगंबर ढवळे यांचा स्तुत्य संकल्प, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड तालुक्यात सध्या दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांसह मुक्या पशुपक्ष्यांनाही सोसाव्या लागत आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी आणि पक्ष्यांची होणारी भटकंती लक्षात घेऊन पिंपरखेड येथे माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा अनोखा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरखेड आणि श्री विंचरणा विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गाव परिसरात वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी पाच ठिकाणी पानवटे आणि पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन आज श्री विंचरणा विद्यालय, पिंपरखेड येथे पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षक गणेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर ढवळे यांनी दुष्काळ संपेपर्यंत वन्यप्राणी, पशुपक्ष्यांसाठी पाण्याचे नियोजन सातत्याने सुरू ठेवणार असल्याचा संकल्प जाहीर केला.
यावेळी बोलताना दिगंबर ढवळे म्हणाले की, सध्या पाणीटंचाईचा सामना केवळ माणसांनाच करावा लागत नाही, तर वन्यप्राणी आणि पक्ष्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या मुक्या जीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी आहे. त्यामुळे गाव परिसरात पाच ठिकाणी पानवटे व पाणपोईची व्यवस्था करण्यात आली असून दुष्काळ संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
पक्षी निरीक्षक गणेश राऊत यांनी आपल्या मनोगतात, ‘पक्षी आणि वन्यप्राणी वाचले तरच ही पृथ्वी वाचेल,’ असे सांगत निसर्गातील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनोबा भावे सेवा प्रतिष्ठान, मलठणचे अध्यक्ष पोपट आबा खोसे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आजपासूनच घराजवळ पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस सहाय्यक निरीक्षक अरुण शिंदे, जैवविविधता परिषद महाराष्ट्राचे भीमराव शिंदे, नवनाथ गायकवाड, ह.भ.प. दादा हरी खोसे, भाऊसाहेब झिंजाडे, फकीरभाई शेख, पत्रकार पोपट गायकवाड यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेल्हाळ सर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक खताळ सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर मुजावर सर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ससाणे सर, काळाने सर आणि पिंटू मामा ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत माणसांसोबत मुक्या जीवांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणारा पिंपरखेडचा हा उपक्रम निश्चितच पर्यावरण संवर्धनाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.