झोपलेल्या कुटुंबाला घरातच केले कैद! रत्नापुरात चोरट्यांचा १ लाख १५ हजारांच्या सोन्यावर हात साफ!
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करत तब्बल १ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, घरातील कुटुंबीय झोपलेले असतानाच चोरट्यांनी घरात प्रवेश करून एका खोलीतील साहित्याची उचकापाचक केली आणि देवघरात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. एवढेच नव्हे तर कुटुंबीयांना जाग येऊ नये म्हणून झोपलेल्या खोलीच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे रत्नापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नापूर येथील एका घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी घरातील सर्व कुटुंबीय झोपलेले होते. चोरट्यांनी घरातील एका खोलीतील साहित्याची उचकापाचक केली. त्यानंतर देवघरात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
या चोरीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घरातील झोपलेल्या कुटुंबीयांना जाग येऊ नये, यासाठी चोरट्यांनी झोपलेल्या खोलीच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घरातच कुटुंबीय झोपलेले असताना चोरट्यांनी अशा प्रकारे चोरी केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जामखेड तालुक्यात यापूर्वीही चोरीच्या घटना घडत असताना आता थेट घरातील माणसे झोपलेली असतानाच चोरट्यांनी घरफोडी केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
घरात माणसे असतानाही चोरट्यांचे धाडस एवढे वाढले की, आता नागरिकांनी घरात झोपतानाही सुरक्षिततेची चिंता करायची का? असा संतप्त सवाल रत्नापूर परिसरातून उपस्थित केला जात आहे.