Thursday, November 19, 2026
Home ताज्या बातम्या NH-548D च्या खड्ड्यांनी जामखेडकर त्रस्त! आता रस्त्यासाठी ‘भीक मांगो’ आंदोलनाचा इशारा! ...

NH-548D च्या खड्ड्यांनी जामखेडकर त्रस्त! आता रस्त्यासाठी ‘भीक मांगो’ आंदोलनाचा इशारा! प्रशासन झोपेत, रस्ते खड्ड्यात! जामखेडकरांचा संतापाचा उद्रेक!

0
2
NH-548D च्या खड्ड्यांनी जामखेडकर त्रस्त! आता रस्त्यासाठी ‘भीक मांगो’ आंदोलनाचा इशारा!  प्रशासन झोपेत, रस्ते खड्ड्यात! जामखेडकरांचा संतापाचा उद्रेक!

जामखेड न्युज – – – – – – 

NH-548D च्या खड्ड्यांनी जामखेडकर त्रस्त! आता रस्त्यासाठी ‘भीक मांगो’ आंदोलनाचा इशारा!

प्रशासन झोपेत, रस्ते खड्ड्यात! जामखेडकरांचा संतापाचा उद्रेक!

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी चे काम गेल्या जवळपास तीन वर्षांपासून रखडल्याने जामखेडकरांना खड्ड्यांतून प्रवास करण्याची वेळ आली आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, धोकादायक उंचवटे आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालक, व्यापारी, पादचारी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार मागण्या, आंदोलने आणि उपोषणे करूनही रस्त्याची समस्या कायम असल्याने नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे.

रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अन्यथा नागरिकांच्या वतीने ‘भीक मांगो’ आंदोलन करून निधी उभारण्यात येईल, असा इशारा समस्त जामखेडकरांच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी तहसीलदार, जामखेड यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गाचे काही भागातील काम पूर्ण झाले असले, तरी शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. विशेषतः समर्थ हॉस्पिटल, खर्डा चौक, जुना विंचरणा नदी पूल आणि पंचदेवालय चौक (कर्जत रोड) या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर ठिकठिकाणी उंचवटे निर्माण झाले आहेत.

या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. लहान-मोठे अपघात वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ता?
दिवसा खड्डे चुकवताना वाहनचालकांची दमछाक होत असताना रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे. अंधारात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी यापूर्वीही अनेक वेळा आंदोलने आणि उपोषणे करण्यात आली. मात्र, आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. तीन वर्षांचा कालावधी उलटूनही राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होत नसेल, तर सामान्य नागरिकांनी नेमके कोणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चार ठिकाणच्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी!
निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी वरील सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, समर्थ हॉस्पिटल, खर्डा चौक, जुना विंचरणा नदी पूल आणि पंचदेवालय चौक येथील मोठमोठे खड्डे त्वरित बुजवावेत, धोकादायक उंचवटे दूर करून कायमस्वरूपी रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे!
प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. अन्यथा नागरिकांच्या वतीने ‘भीक मांगो’ आंदोलन करून रस्त्याच्या कामासाठी निधी गोळा करण्याचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

यावेळी मनसेचे नेते प्रदीप (भाऊ) टापरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास (दादा) मासाळ, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चंदन, आण्णा माकुडे, अविनाश भोसले, नंदकुमार आव्हाड, जगन्नाथ म्हेत्रे आदींसह समस्त जामखेडकर उपस्थित होते.
जामखेडकरांचा सवाल एकच — राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली आणखी किती दिवस खड्ड्यांतून प्रवास करायचा? प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!