जामखेडमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस! गायींच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर, दोघे किरकोळ जखमी, नगरपरिषद प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहणार?
जामखेड शहरात मोकाट जनावरे, भटकी कुत्री आणि डुकरांचा वाढता उपद्रव व घाणीचे साम्राज्य व जागोजागी कचऱ्याचे ढीग आता नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहेत. शहरातील विविध भागांत मोकाट गायींकडून नागरिकांवर अचानक हल्ले होत असून, नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत, तर अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
शाळेतून मुलीला आणण्यासाठी गेलेल्या आईवर गायीचा हल्ला! जामखेड शहरातील विंचरणा नदीजवळील महादेव मंदिर परिसरात दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास रेखा विलास बळे (वय ३०) या आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेल्या असताना अचानक मोकाट गायीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून डोक्याला टाके पडले आहेत. त्यांना तातडीने पन्हाळकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
दुसरी घटना नागेश शाळेजवळ सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. आश्राबाई रेवनाथ देशमुख या मराठी शाळेतून भात शिजवून घरी परतत असताना अचानक मोकाट गायीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गालाला गंभीर दुखापत झाली असून तब्बल २५ टाके पडले असून त्या समर्थ हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत.
खाडे नगर परिसरातही हल्ले; दोघे किरकोळ जखमी! याशिवाय खाडे नगर परिसरातही मोकाट जनावरांकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये राधा किशोर वाघचौरे आणि बालम बागवान हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोकाट जनावरांकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याने विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
जामखेड शहरातील अनेक भागांत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. या कचऱ्यामुळे मोकाट कुत्री, डुकरे आणि जनावरांचा वावर वाढत आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर तसेच शाळेत ये-जा करणाऱ्या लहान मुलांवर ही जनावरे अचानक हल्ले करतात. त्यामुळे कचरा व्यवस्थापन आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त हे दोन्ही प्रश्न नगरपरिषदेने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
नागरिकांचा सवाल : आणखी किती जण जखमी झाल्यावर प्रशासन जागे होणार?
शहरातील नागरिकांना सुरक्षितपणे रस्त्यावरून चालताही येऊ नये, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर उपाययोजना करणे आणि जागोजागी साचणाऱ्या कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. मात्र वारंवार अशा घटना घडत असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
नगरपरिषदेने तातडीने विशेष मोहीम राबवून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, कचऱ्याचे ढीग हटवावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल जामखेडकर उपस्थित करत आहेत.
चौकट या घटनेनंतर रेखा बळे यांचे पती विलास बबन बळे यांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच या घटनेत जखमी झालेल्या पत्नीच्या उपचाराचा खर्च नगरपरिषदेने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट २ या आगोदरही शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले होते तरीही नगरपरिषद प्रशासनास त्याचे काहीही देणेघेणे नाही.
चौकट ३ मानसे मरण्याची वाट पाहताय काय? आबालवृद्धांना होणारा सततचा त्रास, मुलांना शाळेत ये जा करताना होणारा त्रास, रस्त्यावरील घाण, कचऱ्याचे ढीग, मोकाट जनावरे, कुत्रे, डुक्करांचा सुळसुळाट हे सर्व मुख्याधिकारी यांना खरेच दिसत नाही का? आज महिलांवर झालेल्या मोकाट जणावरांचा हल्ला तसेच काही दिवसांपूर्वी एका चिमुकलीचा मोकाट कुत्र्यांने हल्ला करून डोळा बुबुळ बाहेर काढले होते. मोलमजुरी करणाऱ्या परिवाराला दहा लाख रुपये दवाखान्यात मोजावे लागले अहो मुख्याधिकारी साहेब आता काय मानसे मरण्याची वाट पहात आहात काय? साहेब फार सुस्त राहू नका जामखेड करांच्या संयमाचा अंत पाहू नका असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. नेते मंडळी या गंभीर बाबीकडे लक्ष देतील असा खोटा विश्वास जनतेला वाटत आहे. अशी चर्चा जामखेड कर जनमानसात सध्या ऐकायला मिळत आहे.