दिवाळीत जामखेड एसटीची धडाकेबाज कमाई! १३ दिवसांत तब्बल ९४ लाख ९६ हजारांचे उत्पन्न, गतवर्षीपेक्षा ३४ लाखांची भरघोस वाढ!
चालक-वाहकांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला यश!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामखेड आगाराने यंदाच्या दिवाळी सणाच्या जादा वाहतूक कालावधीत उत्पन्नाचा नवा विक्रम नोंदवत दमदार कामगिरी केली आहे. अवघ्या १३ दिवसांत तब्बल ९४ लाख ९६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत जामखेड आगाराने गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३४ लाख ६ हजार रुपयांची वाढ नोंदवली आहे. या कामगिरीमुळे जामखेड आगाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
दि. ५ नोव्हेंबर २०२६ ते १७ नोव्हेंबर २०२६ या १३ दिवसांच्या कालावधीत जामखेड आगाराच्या लालपरीने तब्बल २ लाख २९ हजार किलोमीटरची धाव घेतली. या काळात तब्बल १ लाख २२ हजार प्रवाशांनी एसटी बसमधून प्रवास केला. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावाकडे जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही आगाराने वाहतुकीचे योग्य नियोजन करून प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिली.
या यशामागे आगारातील चालक आणि वाहकांची मेहनत महत्त्वाची ठरली. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन चालक-वाहकांनी जादा कामगिरी बजावत विविध मार्गांवर वाहतूक सुरळीत ठेवली. त्याचबरोबर यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनीही वाहनांची देखभाल व दुरुस्ती वेळेत पूर्ण करून जास्तीत जास्त बसेस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या.
वाहतूक विभाग, यांत्रिकी विभाग आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधत गर्दीच्या मार्गांवर जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक आणि स्थानक प्रमुख यांनीही नियोजनबद्ध कामकाज करून दिवाळीच्या गर्दीचा ताण यशस्वीपणे हाताळला.
विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३४ लाख ६ हजार रुपयांची अतिरिक्त कमाई झाल्याने जामखेड आगाराच्या कामगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रवाशांचा एसटीवरील विश्वास, कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्थापन यांचा या यशात मोठा वाटा असल्याचे चित्र आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आगार व्यवस्थापक प्रशांत शिवाजी काळे यांनी आगारातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी, वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक तसेच स्थानक प्रमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत सेवा देतानाच उत्पन्नातही मोठी वाढ नोंदवणाऱ्या जामखेड आगाराच्या या कामगिरीमुळे लालपरीच्या सेवेला आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यशाची पावती मिळाली आहे.