Monday, November 9, 2026
Home ताज्या बातम्या उसाला ५ हजारांच्या भावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! आंदोलनाचा अहिल्यानगरला फटका, पोलीस अधीक्षकांचा दोन...

उसाला ५ हजारांच्या भावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! आंदोलनाचा अहिल्यानगरला फटका, पोलीस अधीक्षकांचा दोन दिवस वाहतूक वळविण्याचा आदेश जारी!

0
2
उसाला ५ हजारांच्या भावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! आंदोलनाचा अहिल्यानगरला फटका, पोलीस अधीक्षकांचा दोन दिवस वाहतूक वळविण्याचा आदेश जारी!

जामखेड न्युज – – – – – 

उसाला ५ हजारांच्या भावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! आंदोलनाचा अहिल्यानगरला फटका, पोलीस अधीक्षकांचा दोन दिवस वाहतूक वळविण्याचा आदेश जारी!

उसाला प्रतिटन ५ हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी संघटनेचे (शिवसेना शिंदे गट) उपाध्यक्ष रविंद्र बापूसाहेब मोरे व इतर कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांसमोर रस्त्यावर मंडप उभारून तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली रस्त्यावर आडवे लावून रास्ता रोको करण्यात येत आहे.

या आंदोलनामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३३ (१) (ब) अन्वये आदेश जारी केला आहे.

त्यानुसार ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून आंदोलन संपेपर्यंत अवजड वाहने तसेच सर्व प्रकारची चारचाकी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

कोणत्या मार्गावरील वाहतूक कुठून जाणार?
१) अहिल्यानगरकडून राहुरी, शिर्डी, मनमाड, मालेगाव व धुळेकडे जाणारी अवजड वाहने :
विळद सर्कल – दुधडेअरी चौक – शेंडी बायपास – नेवासा फाटा – कायगाव टोके – गंगापूर – वैजापूर मार्गे इच्छित स्थळी.
२) मनमाडकडून कोपरगाव, शिर्डी, राहुरीमार्गे अहिल्यानगरकडे येणारी वाहने :
कोपरगाव – पुणतांबा फाटा – वैजापूर मार्गे इच्छित स्थळी.
३) अहिल्यानगरकडून संगमनेर व नाशिककडे जाणारी अवजड वाहने :
कल्याण बायपास – आळेफाटा – संगमनेर मार्गे इच्छित स्थळी.
४) सिन्नर – लोणीमार्गे अहिल्यानगरकडे येणारी अवजड वाहने :
संगमनेर – आळेफाटा मार्गे इच्छित स्थळी.

अत्यावश्यक सेवांना आदेशातून सूट
शासकीय वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेली वाहने यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार असून, पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा!
उस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घ्यावी. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!