दिवाळीच्या आनंदावर काळाचा घाला! येडशीत किराणा दुकानाला भीषण आग, एकाच करंडे कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू! दोन ज्येष्ठांसह दोन अल्पवयीन मुलींचा समावेश, आगीत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, परिसरात शोककळा!
दिवाळीच्या आनंदावर काळाचा घाला! येडशीत किराणा दुकानाला भीषण आग, एकाच करंडे कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!
दोन ज्येष्ठांसह दोन अल्पवयीन मुलींचा समावेश, आगीत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, परिसरात शोककळा!
राज्यभर दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. येथील करंडे किराणा अँड गिफ्ट सेंटर या दुकानाला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. दुकानातून सुरू झालेल्या आगीने काही क्षणांतच वरच्या मजल्यावरील घराला वेढा घातला. या दुर्घटनेत एकाच करंडे कुटुंबातील सहा सदस्यांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिक, एक दाम्पत्य आणि दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवावर या घटनेने दुःखाची काळी छाया पसरली असून संपूर्ण येडशी गाव शोकसागरात बुडाले आहे.
मध्यरात्री आगीचे रौद्ररूप, घरातील सहा जणांचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथील करंडे किराणा अँड गिफ्ट सेंटर या दुकानाला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. दुकानातून सुरू झालेली आग वरच्या मजल्यावर असलेल्या करंडे कुटुंबाच्या घरापर्यंत पोहोचली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरात अडकलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचा परिणाम होऊन सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तुळजापूर आणि कळंब येथून अग्निशमन दलाची वाहने मागविण्यात आली. रात्रीपासून पहाटेपर्यंत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत या हृदयद्रावक दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे (वय ७५), चंद्रकला उत्तम करंडे (वय ७०), गोविंद उत्तम करंडे (वय ४७), ज्योती गोविंद करंडे (वय ४२), गायत्री गोविंद करंडे (वय १६) आणि सिद्धी गोविंद करंडे (वय १५) यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने करंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुली आणि दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने या घटनेने प्रत्येकाचे मन हेलावून गेले आहे.
आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांची मध्यरात्री घटनास्थळी धाव या दुर्घटनेची माहिती मिळताच तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ते येडशी येथे दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून बचावकार्य आणि मदतकार्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. तुळजापूर व कळंब येथून अग्निशमन दलाची वाहने मागविण्यात आली.
गावकरी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले. या दुर्घटनेत एकाचा जीव वाचविण्यात यश आले; मात्र सहा जणांना वाचवता आले नाही, याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली. ‘ही घटना मन सुन्न करणारी’; आमदार पाटील यांच्याकडून श्रद्धांजली या घटनेबाबत भावना व्यक्त करताना आमदार राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले की, येडशी येथे दुकानाला लागलेल्या आगीने शेजारील घरालाही वेढा घातला. या भीषण दुर्घटनेत गोविंद करंडे यांच्या कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह दोन ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी आहे.
करंडे कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा आहे. मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या असह्य दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू दरम्यान, या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट किंवा दिवाळीच्या पणत्यांमुळे आग लागली असावी, असा नागरिकांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. धाराशिव ग्रामीण पोलीस या घटनेचा तपास करत असून तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण; मात्र याच सणाच्या काळात येडशीतील करंडे कुटुंबावर काळाने घाला घातला. एका आगीत सहा जीव गेल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.