Home शैक्षणिक बातम्या विज्ञान प्रयोगांतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख, रोहित घोडेस्वार सरांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल!...

विज्ञान प्रयोगांतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख, रोहित घोडेस्वार सरांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल! जिद्द, कल्पकता अन् विज्ञानाची कास!मिसाईल मॅन’ विद्यार्थीप्रिय शिक्षक रोहित घोडेस्वार सरांचा राज्यस्तरीय गौरव

0
4
विज्ञान प्रयोगांतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख, रोहित घोडेस्वार सरांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल!  जिद्द, कल्पकता अन् विज्ञानाची कास!मिसाईल मॅन’ विद्यार्थीप्रिय शिक्षक रोहित घोडेस्वार सरांचा राज्यस्तरीय गौरव

जामखेड न्युज – – – – – 

विज्ञान प्रयोगांतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख, रोहित घोडेस्वार सरांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल!

जिद्द, कल्पकता अन् विज्ञानाची कास!मिसाईल मॅन’ विद्यार्थीप्रिय शिक्षक रोहित घोडेस्वार सरांचा राज्यस्तरीय गौरव

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून त्यांना प्रयोगशील शिक्षणाची गोडी लावणारे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक रोहित कुमार घोडेस्वार यांना बी द चेंज फाउंडेशन, शिर्डी यांच्या वतीने दिला जाणारा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आला. त्यांच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची दखल घेत झालेल्या या गौरवामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

घोडेस्वार सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान केवळ पुस्तकातून न शिकवता प्रत्यक्ष प्रयोग, शैक्षणिक उपकरणे आणि विज्ञान प्रतिकृतींच्या माध्यमातून शिकवण्यावर भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाविषयी कुतूहल निर्माण होत आहे.

जिल्हा विज्ञान प्रदर्शनात दोनदा प्रथम क्रमांक!
सन २०१८-१९ मध्ये ‘किट फॉर युनिफॉर्म अॅक्सिलरेशन’ या शैक्षणिक उपकरणाला अहिल्यानगर जिल्हा विज्ञान-गणित प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यानंतर २०२५-२६ मध्ये ‘रॉकेट फॉर लर्निंग मिशन’ या मॉडेलनेही जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही यशांमुळे त्यांनी सांगली आणि नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.

विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधनाची माहिती मिळावी, यासाठी त्यांनी विद्यालयात आठ फूट उंच आणि २७ किलो वजनाची पीएसएलव्ही रॉकेटची प्रतिकृती तयार केली. याशिवाय भारतीय मानक ब्युरोचे (BIS) मेंटोर म्हणूनही ते कार्यरत आहेत.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
रविवारी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अहिल्यानगरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे , त्रिदल सैनिक संघाचे नाशिक येथील सेवानिवृत्त कार्याध्यक्ष अरुण भंडारे, विश्वरूप इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक बाबासाहेब कापे, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक निलेश घोडेचोर, अभिनेत्री व उद्योजक निवेदिता पगार तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते घोडेस्वार सर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यालयाच्या नावलौकिकात भर
‘विद्यार्थी हेच दैवत’ मानून निष्ठेने कार्य करणाऱ्या रोहित घोडेस्वार सरांच्या या यशाबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाने तसेच ल. ना. होशिंग विद्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक तसेच साकत परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी अभिनंदन केले. त्यांच्या या सन्मानामुळे विज्ञान शिक्षणातील प्रयोगशीलतेला प्रोत्साहन मिळाले असून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!