जामखेड-नगर रोडवर भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, चालक गाडी सोडून फरार! निंबोडीजवळ हॉटेल उत्सवसमोर तीन दुचाकींना भीषण धडक, दुचाकी ५० ते १०० फूट फरफटत गेल्या, एक जण गंभीर जखमी
जामखेड-नगर रोडवर भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, चालक गाडी सोडून फरार!
निंबोडीजवळ हॉटेल उत्सवसमोर तीन दुचाकींना भीषण धडक, दुचाकी ५० ते १०० फूट फरफटत गेल्या, एक जण गंभीर जखमी
अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. निंबोडी गावाजवळ हॉटेल उत्सवसमोर भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. साकत कडभनवाडी येथील सेवानिवृत्त सैनिक रोहिदास कडभने व बाप्पू पवार अशी मृतांची नावे असून, मयूर शिर्के हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तीन दुचाकींना जोरदार धडक अपघाताची भीषणता अंगावर शहारे आणणारी! मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अहिल्यानगरकडून जामखेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने निंबोडी गावाजवळ हॉटेल उत्सवसमोर समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी सुमारे ५० ते १०० फूट अंतरापर्यंत फरफटत गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या भीषण धडकेत रोहिदास कडभने आणि बाप्पू पवार यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मयूर शिर्के हे गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टायर फुटल्याने नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती स्कॉर्पिओ गाडीचे टायर फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. वाहनाचा वेग, टायर फुटण्यामागील कारण आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याचा तपास झाल्यानंतरच अपघाताचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
अपघातानंतर चालक पसार पोलिसांकडून तपास सुरू अपघात घडल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, अपघातातील वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
फरार चालकाचा शोध घेण्यासह अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला का, वाहनाचा वेग किती होता आणि टायर फुटल्याचा दावा कितपत खरा आहे, या बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.
महामार्गावरील वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! या भीषण अपघातामुळे जामखेड-अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरधाव वाहने, वाहनांची तांत्रिक स्थिती आणि वेगावरील नियंत्रण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. दोन जणांचा मृत्यू आणि एक जण गंभीर जखमी झाल्याने जामखेड निंबोडी परिसरात शोककळा पसरली आहे.