जामखेड बाजार समितीच्या नान्नज उपबाजाराचा मार्ग मोकळा! शेतकऱ्यांसाठी २.४० हेक्टर शासकीय जमीन मंजूर नान्नज परिसरातील शेतकऱ्यांना आता स्थानिक पातळीवर शेतमाल विक्रीची सुविधा मिळणार, सभापती पै. शरद कार्ले व संचालक मंडळाच्या मागणीला यश
जामखेड बाजार समितीच्या नान्नज उपबाजाराचा मार्ग मोकळा! शेतकऱ्यांसाठी २.४० हेक्टर शासकीय जमीन मंजूर
नान्नज परिसरातील शेतकऱ्यांना आता स्थानिक पातळीवर शेतमाल विक्रीची सुविधा मिळणार, सभापती पै. शरद कार्ले व संचालक मंडळाच्या मागणीला यश
जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नान्नज येथील उपबाजार आवाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नान्नज येथे उपबाजार उभारण्यासाठी तब्बल २ हेक्टर ४० आर (२.४० हेक्टर) शासकीय जमीन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीला मंजूर करण्यात आली आहे. ही जमीन नाममात्र एक रुपया कब्जेहक्क रकमेवर प्रदान करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली.
नान्नज परिसरातील शेतकऱ्यांना शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून बाजार समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नांना आता यश आले असून, उपबाजार आवारासाठी जमीन उपलब्ध झाल्याने नान्नज परिसरातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची होणार धावपळ कमी! नान्नज हे जामखेड शहरापासून सुमारे १५ ते १७ किलोमीटर अंतरावर आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आणताना वाहतुकीचा खर्च, वेळ आणि अन्य अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा पर्यायी व्यवस्थेअभावी काही शेतकऱ्यांना बाजार समितीचे परवाने नसलेल्या अन्य दुकानदारांकडे शेतमाल विकावा लागत असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे शेतमालाच्या व्यवहारात शेतकऱ्यांची गैरसोय होण्याबरोबरच फसवणुकीच्या तक्रारींचीही शक्यता निर्माण होत होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन नान्नज परिसरात स्वतंत्र उपबाजार सुरू करण्याची मागणी पुढे आली होती. स्थानिक शेतकऱ्यांची ही गरज ओळखून बाजार समितीने शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला होता.
तीन वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश! नान्नज परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी पुढाकार घेतला. उपसभापती आणि संचालक मंडळाच्या बैठकीत नान्नज येथे उपबाजार सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शासकीय जमीन मिळवण्यासाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना आता यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नान्नज येथील २ हेक्टर ४० आर शासकीय जमीन बाजार समितीच्या उपबाजार आवारासाठी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आल्याची माहिती सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली.
स्थानिक कृषी व्यापाराला मिळणार चालना! नान्नज येथे उपबाजार आवार उभारल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी जवळच सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यामुळे जामखेडपर्यंत शेतमाल वाहून नेण्याचा खर्च आणि वेळ वाचण्याची अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिकृत बाजार व्यवस्थेत शेतमाल विक्रीची संधी मिळून कृषी व्यापारात पारदर्शकता वाढण्यास मदत होऊ शकते.
उपबाजाराच्या माध्यमातून नान्नज आणि परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच स्थानिक बाजारपेठेचा विकास, कृषी व्यवहारांची वाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाचे मानले आभार नान्नज येथील उपबाजार आवारासाठी शासकीय जमीन मंजूर झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, बाजार समितीच्या सभापती पै. शरद कार्ले आणि संचालक मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उपबाजारासाठी जमीन उपलब्ध होण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता या ठिकाणी उपबाजार आवाराची उभारणी आणि आवश्यक सुविधा विकसित करण्याच्या पुढील प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.