Wednesday, October 7, 2026
Home ताज्या बातम्या अतिक्रमण हटाव मोहिमेत ‘ब्रेक’ का? पत्रकारांच्या प्रश्नावर उपअभियंत्यांशी वाद; उद्या पुन्हा धडक...

अतिक्रमण हटाव मोहिमेत ‘ब्रेक’ का? पत्रकारांच्या प्रश्नावर उपअभियंत्यांशी वाद; उद्या पुन्हा धडक कारवाईचे संकेत

0
2
अतिक्रमण हटाव मोहिमेत ‘ब्रेक’ का? पत्रकारांच्या प्रश्नावर उपअभियंत्यांशी वाद; उद्या पुन्हा धडक कारवाईचे संकेत

जामखेड न्युज – – – – – – 

अतिक्रमण हटाव मोहिमेत ‘ब्रेक’ का? पत्रकारांच्या प्रश्नावर उपअभियंत्यांशी वाद; उद्या पुन्हा धडक कारवाईचे संकेत

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर दुसऱ्याच दिवशी प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिवसभर कारवाई सुरू राहिल्यानंतर दुपारनंतर अचानक कारवाई थांबल्याने व्यापारी, नागरिक आणि पत्रकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कारवाई थांबण्याबाबत विचारणा करणाऱ्या पत्रकारांशी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सुजित चेमटे यांच्याशी वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत गटारीपासून दोन्ही बाजूंनी निश्चित अंतरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात बीड रोड परिसरातील टपऱ्या, दुकाने तसेच बाजार समिती परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असतानाच, ‘कारवाई सर्वांसाठी समान निकषाने होणार का?’ हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

पत्रकारांच्या प्रश्नावर उपअभियंत्यांशी वाद
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सुजित चेमटे हे समर्थ व्हेज हॉटेलमध्ये बसले असताना पत्रकारांनी त्यांच्याकडे अतिक्रमण हटाव कारवाई दुपारनंतर का थांबली, याबाबत विचारणा केली.

यावेळी चेमटे यांनी, ‘मी तुम्हाला बांधील नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. हे प्रश्न राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी ज्योती शिंदे यांना विचारा,’ असे सांगितल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. या प्रकारामुळे उपस्थित पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.
या घटनेची माहिती पत्रकारांनी प्रांताधिकारी नितीन पाटील आणि तहसीलदार शितल सावळे यांना दिली. पत्रकारांशी अशा पद्धतीने संवाद साधला जात असल्यास त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली.


व्यापाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
जामखेड शहरातील व्यापाऱ्यांनी तहसीलदार शितल सावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यापूर्वी करण्यात आलेली अधिकृत मोजणीच ग्राह्य धरावी, तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या गटारीपासून दहा फूट अंतराची मर्यादा स्पष्टपणे निश्चित करून त्यानुसार पारदर्शक पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

‘अधिकृत आणि स्पष्ट मोजणी असेल तर जिथे प्रत्यक्ष अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घेण्यास आम्ही तयार आहोत. आमचा विकासाला विरोध नाही; मात्र विकासाची प्रक्रिया स्पष्ट मोजणी, समान निकष आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे,’ अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.

‘कारवाई सर्वांसाठी समान होणार का?’ — अवधूत पवार
अतिक्रमण हटाव मोहीम शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी महत्त्वाची आहे. मात्र, कारवाई करताना समान निकष लागू होत नसल्याची भावना निर्माण झाली तर प्रशासनाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
त्यामुळे संयुक्त मोजणी अंतिम करून त्याच आधारे कोणताही भेदभाव न करता संपूर्ण अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण करावी, अशी मागणी अवधूत पवार यांनी केली आहे.

आता समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर या दरम्यानची कारवाई प्रशासन कधी आणि कोणत्या निकषाने सुरू करते, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

उद्या पुन्हा ‘धडक’ कारवाईचे संकेत

उद्या अतिक्रमण हटाव मोहीम अधिक जोमाने सुरू राहण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे प्रशासनाची पुढील कारवाई नेमकी कोणत्या भागात होते, कोणत्या मोजणीच्या आधारे होते आणि सर्व अतिक्रमणांवर समान पद्धतीने हातोडा पडतो का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!