जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे गणेशमूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरणेश्वर मंदिरासमोरील सभामंडपात मित्रमंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तीची विटंबना करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याचवेळी मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडण्यात आले असून, घटनास्थळी अज्ञात व्यक्तीची चप्पल आढळून आली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेच्या निषेधार्थ अरणगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.
या प्रकरणी अमोल सिताराम निगुडे (वय ४०, व्यवसाय शेती, रा. अरणगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल निगुडे हे अरणेश्वर मंदिराची देखरेख करतात, तर शिवानंदन त्रिंबक दावणगिरे हे मंदिराचे पुजारी आहेत. बुधवार, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता अमोल निगुडे यांना रोहित चावरे यांनी फोन करून मंदिर परिसरातील प्रकाराची माहिती दिली. रोहित चावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अरणेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस चप्पल सोडली होती. तसेच गाभाऱ्याच्या गेटचे कुलूप तोडण्यात आले होते.
मंदिरासमोरील सभामंडपात मित्रमंडळाने बसविलेल्या गणेशमूर्तीचीही विटंबना झाल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच अमोल निगुडे यांनी तातडीने मंदिराकडे धाव घेतली. त्यावेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. पाहणी केली असता मंदिराचे कुलूप तोडल्याचे, घटनास्थळी चप्पल आढळल्याचे तसेच गणेशमूर्तीची विटंबना झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. ग्रामस्थ आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करून कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी जामखेड पोलीस ठाणे गाठले.
धार्मिक स्थळी घडलेल्या या प्रकाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी अरणगाव बंद ठेवून घटनेचा तीव्र निषेध केला. दोषी व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अमोल निगुडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश अघाव पुढील तपास करीत आहेत. घटनेमागील व्यक्ती कोण, याचा पोलीस तपास सुरू असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.