Monday, September 14, 2026
Home ताज्या बातम्या पक्षांची शाळा! ZPPS धनगरवस्ती, दैवदैठण येथे माणुसकीचा अनोखा धडा दप्तरावर, डोक्यावर फिरणारं...

पक्षांची शाळा! ZPPS धनगरवस्ती, दैवदैठण येथे माणुसकीचा अनोखा धडा दप्तरावर, डोक्यावर फिरणारं चिमणीचं पिल्लू बनलं शाळेचा लाडका विद्यार्थी!

0
2
पक्षांची शाळा! ZPPS धनगरवस्ती, दैवदैठण येथे माणुसकीचा अनोखा धडा दप्तरावर, डोक्यावर फिरणारं चिमणीचं पिल्लू बनलं शाळेचा लाडका विद्यार्थी!

जामखेड न्युज – – – – – 

पक्षांची शाळा! ZPPS धनगरवस्ती, दैवदैठण येथे माणुसकीचा अनोखा धडा
दप्तरावर, डोक्यावर फिरणारं चिमणीचं पिल्लू बनलं शाळेचा लाडका विद्यार्थी!

जामखेड तालुक्यातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्ती, दैवदैठण येथे सध्या एक अनोखं आणि मनाला भिडणारं दृश्य पाहायला मिळत आहे. या शाळेला आता लोक “पक्षांची शाळा” म्हणू लागले आहेत. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. दि. २ सप्टेंबर रोजी मुंबईतील जवाहर बालभवन येथे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन’ बैठकीत शिक्षक लहू बोराटे यांना आपल्या शाळेतील विविध प्रयोग व उपक्रम सादर करण्याची संधी मिळाली होती. आता पुस्तकातून पर्यावरण शिकवण्यापेक्षा असा थेट निसर्गाशी जोडलेला अनुभव मुलांना निसर्गावर प्रेम करायला शिकवतो. ZPPS धनगरवस्ती दैवदैठण शाळेने घालून दिलेला हा आदर्श संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे.

शाळेच्या आवारातील झाडावर एका चिमणीने घरटं केलं. त्या घरट्यात अंडी घातली आणि त्यातून एक छोटंसं पिल्लू जन्माला आलं. पण हे पिल्लू आता शाळेच्या आवारातच रमलं आहे.

शाळेचे उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे यांनी सांगितले की, “हे पिल्लू गेल्या ३-४ दिवसांपासून मुलांच्या दप्तरावर येऊन बसतंय, मुलांच्या खांद्यावर, शरीरावर बसतंय. आज तर माझ्या डोक्यावर येऊन बसलं होतं.”

दप्तरावर बसून अभ्यास, झाडावर उडण्याची शाळा! पिवळं-हिरवट छोटं पिल्लू मुलांच्या दप्तरावर निवांत बसलं आहे. मुले झाडाखाली बसून अभ्यास करत आहेत आणि ते पिल्लू त्यांच्यातच एक विद्यार्थी असल्यासारखं वावरत आहे. कधी झाडाच्या फांदीवर, कधी शाळेच्या भिंतीवर त्याची उडण्याची शाळा सुरू आहे.

सर्वात सुंदर क्षण म्हणजे शाळेतील सर्व मुले लाल गणवेशात आकाशाकडे बोट दाखवत त्या पिल्लाला उडताना पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल अवर्णनीय आहे. पिल्लाची आई सुद्धा झाडावरून ओरडत आपल्या पिल्लावर लक्ष ठेवून आहे.

शिक्षक बोराटे म्हणाले, “इथे पक्ष्यांना सुरक्षित वातावरण भेटलं आहे. शाळा खऱ्या अर्थाने इथे पक्ष्यांची पण शाळा भरलेली आहे. हा लेकरांसाठी किती सुंदर अनुभव आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!