Home ताज्या बातम्या सिनेस्टाईल पाठलाग! खर्डा पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई, 51 लाख 41 हजारांचा मुद्देमाल...

सिनेस्टाईल पाठलाग! खर्डा पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई, 51 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
7

जामखेड न्युज – – – – – 

सिनेस्टाईल पाठलाग! खर्डा पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई, 51 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त

खर्डा पोलिसांनी गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित टेम्पो चालकाने पोलिसांच्या इशाऱ्यानंतर वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढल्याने पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून हे वाहन ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका आयशर टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन धाराशिवकडून बीडकडे राज्य महामार्गावरून वाहतूक केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जातेगाव फाटा, खर्डा येथे नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी संशयित आयशर टेम्पो येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने बीडच्या दिशेने पळविले.

पोलिस पथकाने तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर संशयित वाहन ताब्यात घेण्यात आले. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी सुपारी आढळून आली.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारीची अंदाजे किंमत ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये, तर आयशर टेम्पोची अंदाजे किंमत १० लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी राजू मेहबूब शेख (रा. भेंडटाकळी, ता. गेवराई, जि. बीड), प्रदीप विष्णू गायकवाड (रा. चव्हाटा फाटा, ता. जि. बीड) आणि तुषार नामदेव कुसळकर (रा. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि SDPO सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, पोलीस हवालदार संभाजी शेंडे, गोकुळ इंगळे, रावसाहेब नागरगोजे, शशिकांत म्हस्के, विजयनाथ मिसाळ, बाळू खाडे, आनंद धनवडे, विष्णू आवारे, अशोक बडे, राहुल खेडकर, होमगार्ड तानाजी जायभाय, महादेव कदम व राहुल भिसे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत.

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर खर्डा पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!