Home ताज्या बातम्या जामखेडच्या पाणी प्रश्नावर विकी सदाफुले यांचा आंदोलनाचा इशारा, मुख्याधिकाऱ्यांनी कायद्याची...

जामखेडच्या पाणी प्रश्नावर विकी सदाफुले यांचा आंदोलनाचा इशारा, मुख्याधिकाऱ्यांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी

0
4
जामखेडच्या पाणी प्रश्नावर विकी सदाफुले यांचा आंदोलनाचा इशारा,   मुख्याधिकाऱ्यांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडच्या पाणी प्रश्नावर विकी सदाफुले यांचा आंदोलनाचा इशारा 

मुख्याधिकाऱ्यांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी

 

जामखेड शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शहराला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते विकी (भाऊ) सदाफुले यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून पाणीपुरवठ्याबाबत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. एकेकाळी चौवीस तास पाणीपुरवठा होणाऱ्या शहरात आता दहा ते बारा दिवसांतून एकदा एक तास पाणी मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून उजणी पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे.

जामखेड शहरातील नागरिकांकडून नियमितपणे पाणीपट्टी व इतर कर भरले जात असताना, त्या बदल्यात नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक असल्याचे सदाफुले यांनी म्हटले आहे. अनेकदा १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम, १९६५ मधील संबंधित तरतुदींचा आधार घेत शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच भुतवडा तलावात पाणी उपलब्ध असतानाही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक अडचणी समजून घेऊन किमान तीन दिवसांच्या अंतराने तरी नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वारंवार प्रतीक्षा करावी लागू नये आणि शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ग्रामस्थांच्या वतीने ‘ढोल बजाओ आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

“नियमित पाणी हा आमचा हक्क आहे; तो मिळाला नाही तर आंदोलन उभारणार,” अशी भूमिका सदाफुले यांनी मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात जामखेड शहरातील पाणीप्रश्नावर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!