Home ताज्या बातम्या श्री साकेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; माजी विद्यार्थिनींकडून शिक्षकांना अनोखी गुरुदक्षिणा

श्री साकेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; माजी विद्यार्थिनींकडून शिक्षकांना अनोखी गुरुदक्षिणा

0
6

जामखेड न्युज – – – – 

श्री साकेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; माजी विद्यार्थिनींकडून शिक्षकांना अनोखी गुरुदक्षिणा

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथे गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक भरत लहाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र वराट गुरुजी, लक्ष्मण वराट गुरुजी तसेच ज्ञानदेव मुरूमकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी मार्गदर्शन करताना रामचंद्र वराट गुरुजी म्हणाले, “भारतीय संस्कृतीत गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांनाही गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे लागले. गुरू हा विद्यार्थ्याच्या जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि निष्ठा कायम ठेवावी.”

यावेळी ज्ञानदेव मुरूमकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक हे अत्यंत गुणी, अनुभवी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेत जीवनात मोठे यश संपादन करावे.”

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करणारी मनोगते व्यक्त केली. तसेच गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगणारे विविध उपक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता दहावी (२०२३ बॅच) (२०२४ बॅच) मधील माजी विद्यार्थीनींनी शाळेला भेट देऊन सर्व शिक्षकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत शाळेला सर्व शिक्षकांचे छायाचित्र असलेली सुंदर फोटो फ्रेम भेट देत आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त केला. या अनोख्या गुरुदक्षिणेमुळे कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी शिक्षक अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, सागर पवार, ज्योती लहाने, अतुल दळवी, आश्रू सरोदे यांच्यासह सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दहावीच्या विद्यार्थीनीनी केले
गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी सातवी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यीनी अमृता मोहिते हिचा सन्मान करण्यात आला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!