जामखेड न्युज – – – – –
जमीन वाद आणि धमक्यांना कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओच्या आधारे दोघांवर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जमीन बळकावण्याचा आरोप, विजेच्या पोलच्या वादातून सतत धमक्या; खर्डा पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण
जमीन हडपण्याचा प्रयत्न, शेतातील विजेच्या पोलच्या वादातून मिळणाऱ्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून दरडवाडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील विकास साहेबराव रणसिंग (वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २६ जुलै) सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून त्या व्हिडिओच्या आधारे दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विकास रणसिंग यांनी राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यांची बहीण सुवर्णा पोडमल व पत्नी विद्या रणसिंग यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने खर्डा येथील लाड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे आणण्यात आला.

दरम्यान, पत्नी विद्या रणसिंग यांनी पतीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ आढळून आले. या व्हिडिओमध्ये विकास रणसिंग यांनी आपल्या आत्महत्येस दोन व्यक्तींना जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत.

व्हिडिओमध्ये त्यांनी दरडवाडी येथील महादेव गोवर्धन दराडे याच्यावर आपली सहा गुंठे जमीन बळकावल्याचा तसेच ती परत देण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. काही महिन्यांपूर्वी बाटलीने डोक्यावर वार करून मारहाण केल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. तसेच बाळगव्हाण येथील चतुर्भुज दाताळ याच्यासोबत शेतातील बांधावरून विजेची लाईन व पोल नेण्यावरून सुरू असलेल्या वादामुळे सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.




