जामखेड न्युज – – –
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील भुसाळ वस्ती, निर्मळ वस्ती व राऊत वस्ती परिसरात बिबट्याचे रोज दर्शन होत असून रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय निर्मळ यांनी केली आहे.
पिंपरी निर्मळ मधील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. गावाचा शिवार मोठा असल्याने तसेच गावात डाळींब बागांचे प्रमाण जास्त असल्याने तसेच चारा पिकेही वाढली असल्याने लपण्यासाठी पुरेशी जागा आहे. येथील अनेक भागात बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे.
देसाई वस्ती भागात एका बिबट्याचा विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्युही झाला आहे. गावातील राऊत वस्ती, निर्मळ वस्ती तसेच भुसाळ वस्ती परिसरात बिबट्या आढळला आहे. या बिबट्याने परीसरातील शेळ्या, कुत्रे फस्त केले आहे. अनेकांना दिवसा दर्शन झाल्याने रहिवाशांना विशेषतः महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रा. पं. सदस्य दत्तात्रय निर्मळ यांनी केली आहे.






