Saturday, July 18, 2026
Home ताज्या बातम्या पेट्रोलपंप डिलरशिपच्या आमिषाने जामखेडच्या व्यावसायिकाची ८४.५३ लाखांची ऑनलाइन फसवणूक प्रोसेसिंग...

पेट्रोलपंप डिलरशिपच्या आमिषाने जामखेडच्या व्यावसायिकाची ८४.५३ लाखांची ऑनलाइन फसवणूक प्रोसेसिंग फी, परवाना व प्रशासकीय शुल्कांच्या नावाखाली उकळले लाखो; दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा

0
4

जामखेड न्युज – – – – – 

पेट्रोलपंप डिलरशिपच्या आमिषाने जामखेडच्या व्यावसायिकाची ८४.५३ लाखांची ऑनलाइन फसवणूक

प्रोसेसिंग फी, परवाना व प्रशासकीय शुल्कांच्या नावाखाली उकळले लाखो; दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा

 

जामखेड येथील एका व्यावसायिकाला पेट्रोलपंपाची डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी डिपॉझिट, परवाना शुल्क, कागदपत्रांची पडताळणी तसेच विविध प्रशासकीय शुल्कांच्या नावाखाली आरोपींनी वेळोवेळी मोठ्या रकमा उकळल्या. अखेर डिलरशिप न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सौरभ अग्रवाल व शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदय गुलाबराव शिंदे (वय ५४, रा. रामेश्वर एजन्सी, मार्केटयार्डसमोर, बीड रोड, जामखेड) यांचा कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून ‘जिओ’ कंपनीचा पेट्रोलपंप उभारण्यासाठी अधिकृत डिलरशिप व परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कंपनीकडून मंजुरी मिळविण्यासाठी प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी डिपॉझिट, परवाना शुल्क, कागदपत्रांची पडताळणी आणि विविध प्रशासकीय प्रक्रियांसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगून आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला.

डिलरशिप निश्चित मिळणार असल्याचे भासवून आरोपींनी फिर्यादींकडून वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये तसेच ऑनलाइन व्यवहारांद्वारे मोठ्या रकमा जमा करून घेतल्या. ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत फिर्यादींनी आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये एकूण ८४ लाख ५३ हजार रुपये जमा केले.

मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही ना पेट्रोलपंपाची डिलरशिप मिळाली, ना कोणताही अधिकृत परवाना मिळाला. उलट आरोपींकडून सतत टाळाटाळ केली जात असल्याने फिर्यादींना संशय आला. स्वतः चौकशी केल्यानंतर संपूर्ण व्यवहार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींनी वापरलेली बँक खाती, ऑनलाइन व्यवहार आणि तांत्रिक पुरावे यांची सखोल तपासणी केली जात आहे.

नागरिकांना सायबर पोलिसांचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही कंपनीची डिलरशिप, फ्रँचायझी किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी रक्कम भरण्यापूर्वी संबंधित कंपनीकडून अधिकृत पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया, फोन कॉल किंवा ई-मेलद्वारे मिळणाऱ्या आकर्षक ऑफरवर त्वरित विश्वास ठेवू नये.

कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!