जामखेड न्युज – – – – – लक्ष्मण सर्जेराव वराट गुरुजींचा अमृतमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
“चिमणीच्या उजेडातून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा दीपस्तंभ”
जवळा, साकत, सावरगाव येथे 35 वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक लक्ष्मण सर्जेराव वराट गुरुजी यांचा अमृतमहोत्सवी 75 वा वाढदिवस सोहळा मुलगा माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव वराट, मुलगी व नातेवाईकांनी जामखेड येथे मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा केला.
1951 साली अत्यंत गरीब व अशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या वराट गुरुजींनी मोलमजुरी करून, सावकाराकडून कर्ज काढून आपले शिक्षण पूर्ण केले. घरात दिवा नसताना आईच्या प्रेरणेने चिमणीच्या उजेडात अभ्यास करून ते शिक्षक झाले. विशेष म्हणजे त्यांचे बंधू दत्तात्रय वराट हे बी.ए. पदवीधर असूनही त्यांनी नोकरी न करता लक्ष्मणरावांच्या शिक्षणासाठी कुटुंबाला हातभार लावला.
जवळा येथून सेवेला सुरुवात करून त्यांनी साकत येथे सलग 28 वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सावरगाव येथून 2009 साली ते सेवानिवृत्त झाले. 35 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी कधीही राजकारण केले नाही. शिस्त, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या हातून घडलेले शेकडो विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, शिक्षक म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
अमृतमहोत्सवी सत्काराला उत्तर देताना वराट गुरुजी भावूक झाले. ते म्हणाले, “आईने शिकवलं – परिस्थितीला शरण जाऊ नकोस. अर्धपोटी राहिलो, पण शाळा चुकवली नाही. आज माझी मुलं-मुली शिकली, नातवंडं शिकत आहेत. हेच माझ्या आयुष्याचं यश आहे. शिक्षकाने राजकारण न करता फक्त मुलं घडवावीत, हाच माझा मंत्र होता.”
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नातेवाईक, मित्रमंडळी, विद्यार्थी, शिक्षक, पाहुणे व राऊळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गुरुजींच्या कार्याचा गौरव करत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात गुरुजींचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुरूजींची तुला करण्यात आली.
मुलगा कांतीलाल वराट व महादेव वराट यांनी सर्वाचे आभार मानले.