जामखेडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरणासाठी पांडुरंग माने यांचे दुसर्या दिवशी उपोषण सुरूच
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून जामखेड नगरपरिषदेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जामखेड नगरपरिषद’ असे नाव देण्याची मागणी आता अत्यंत तीव्र झाली आहे. प्रशासनाच्या दिरंगाई आणि चालढकल धोरणाविरुद्ध आक्रमक पाऊल उचलत, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी पुकारलेले बेमुदत ‘साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
जामखेड शहराच्या अस्मितेचा आणि अहिल्यादेवींच्या विचारांचा सन्मान करण्यासाठी नगरपरिषदेला त्यांचे नाव मिळावे, यासाठी पांडुरंग माने यांनी गेली अनेक महिने सातत्याने लढा सुरू ठेवला आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या समाजबांधवांनी आणि शहरवासीयांनी प्रत्यक्ष आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
नगरपरिषद कार्यालयासमोर कालपासून सुरू झालेल्या या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनात सक्रिय सहभागी होण्यासाठी जामखेडमधील विविध क्षेत्रांतील प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक अरुण जाधव, शिवसेना नेते आकाश बाफना, डॉ. भास्कर मोरे, सोमनाथ राऊत. शिवकुमार डोंगरे, अरुणजी शिरसाठ, मनोज कुलथे, आप्पासाहेब लोंढे, विकी पिंपळे, दत्ताभाऊ भिसे, ह.भ.प. महारुद्र नागरगोजे, गणेश गायकवाड, नगरसेवक वाशिम सय्यद, सागर सदाफुले, सचिन काशीद, राजू सदाफुले, मुजफ्फर अत्तर, चेतन राळेभात, दत्ता राळेभात, उमेश भोगे, दीपक देशमुख, महेश मासाळ. विकास मासाळ, सचिन मासाळ, विनोद सोनार, रावसाहेब काशीद, कृष्ण अष्टेकर, आशिष डोंगरे, विकास राऊत, अर्जुन निमकर, भुजंग दळवी, अमर चाऊस. सद्दाम पठाण, संतोष थोरात, अमोल वाघोली आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
याप्रसंगी बोलताना आंदोलनाचे नेतृत्व करणारे पांडुरंग माने म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात रयतेच्या कल्याणासाठी जे ऐतिहासिक कार्य केले, त्याच जामखेडच्या भूमीतील नगरपरिषदेला त्यांचे नाव मिळण्यासाठी आपल्याला उपोषणाला बसावे लागते हे दुर्दैवी आहे. ३०१ व्या जयंतीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर असतानाही प्रशासनाचा उदासीन दृष्टिकोन थोर माऊलीचा अपमान करणारा आहे. जोपर्यंत शासन आणि नगरपरिषद प्रशासन नामकरणाचा अधिकृत निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा अखंड सुरू राहील.”
कालपासून सुरू झालेल्या या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस जर प्रशासनाने या न्याय्य मागणीची तातडीने दखल घेतली नाही, आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे आता सत्ताधारी आणि नगरपरिषद प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.