Thursday, May 21, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यात अवैध सावकारी विरोधात मोठी कारवाई, सहकार विभागाच्या एकाच वेळी तीन...

जामखेड तालुक्यात अवैध सावकारी विरोधात मोठी कारवाई, सहकार विभागाच्या एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी!

0
2

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड तालुक्यात अवैध सावकारी विरोधात मोठी कारवाई, सहकार विभागाच्या एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी!

अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. जामखेड तालुक्यात अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठी धडक कारवाई केली.

तालुक्यात एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकत अवैध सावकारी करणाऱ्यां विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत कोरे धनादेश, खरेदीखते तसेच इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यात अवैध सावकारी सुरू असल्याबाबत प्रशासनाकडे आवश्यक कागदपत्र सह तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, विभागीय निबंधक संभाजी निकम आणि जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश करून, जामखेड चे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समन्वयाने विविध पथके तयार करून सदरची कारवाई केली.

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 च्या कलम 16 अन्वये ही कारवाई करण्यात आली. सहकार विभागाचे 16 अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस दलाचे 6 अधिकारी-कर्मचारी अशा 22 जणांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दोन संशयित ठिकाणांवर छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

छाप्या दरम्यान कोरे धनादेश (Blank Cheques), खरेदीखते (Sale Deeds) , आर्थिक नोंदी असलेल्या वह्या, तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.

या कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाने तालुक्यातील सर्व नागरिकांना अवैध सावकारी विरोधात सहाय्यक निबंधक कार्यालय, जामखेड येथे आवश्यक कागदपत्रासहा तक्रार दाखल केल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट 

“सहकार आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने तीन ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या या सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी व चौकशी सुरू आहे.सदर पडताळणीअंती पुढील आवश्यक ती कारवाई केली जाईल. नागरिकांनी आर्थिक गरजेसाठी शक्यतो राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था अथवा परवाना धारक सावकार यांच्याकडूनच कर्ज घ्यावे.

— दिलीप तिजोरे, सहाय्यक निबंधक तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक, जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!